अमेरिकेच्या प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या सिटी बँकेने (Citi bank) भारतातून गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. गुरुवारी बँकेने सांगितले की, भारतातील आपला कंझ्यूमर बँकिंग बिझनेस बंद करणार आहे. हा निर्णय जागतिक योजनेचा एक हिस्सा आहे. (Citigroup to exit bank's consumer operations in India)
सिटी बँकेच्या कंझ्यूमर बिझनेसमध्ये क्रेडिट कार्ड, रिटेल बँकिंग, होम लोन आणि वेल्थ मॅनेजमेंटचा समावेश आहे. सिटी बँकेची देशभरात ३५ शाखा आहेत. तसेच कंझ्यूमर बिझनेसमध्ये जवळपास ४००० जण काम करतात. बँकेने गुरुवारी सांगितले की, १३ देशांतून हा व्यवसाय बंद करण्यात येणार आहे. सिटी बँकेचे सीईओ रेन फ्रासर यांनी सांगितले की, या देशांमध्ये प्रतिस्पर्धेचे वातावरण नाहीय.
सध्यातरी ही घोषणा असून अद्याप बँकेने याबाबत काही हालचाली सुरु केल्याची माहिती समोर आलेली नाही. भारतातून बाहेर पडण्यासाठी बँकेला काही नियामक संस्थांच्या मंजुरीची आवश्यकता लागणार आहे.
१९०२ मध्ये भारतात प्रवेश
सिटी बँक भारतात नवीन नसून जवळपास ११९ वर्षांचा इतिहास आहे. सिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशु खुल्लर यांनी सांगितले की, या घोषणेमुळे आमच्या सहकाऱ्यांवर तत्काळ कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही आमच्या ग्राहकांची सेवा करत राहणार आहोत. आजच्या घोषणेने बँकेची सेवा आणखी मजबूत होईल. बँकेने १९०२ मध्ये भारतात प्रवेश केला होता. १९८५ मध्ये कंझ्यूमर बँकिंग बिझनेस सुरु केला होता.