नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर घरी स्वयंपाक करण्यापासून ते वाहनांमध्ये प्रवास करणे महाग होणार आहे. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी गेलद्वारे सिटी गॅस कंपन्यांना पुरवलेल्या गॅसमध्ये मासिक पुनरावलोकनानंतर 18 टक्के वाढ करण्यात आली आहे.
गेलमार्फत सिटी गॅस कंपन्यांना पुरवलेल्या नॅच्युरल गॅसची किंमत 1 ऑगस्ट 2022 पासून 18 टक्क्यांनी वाढवून 10.5 डॉलर प्रति युनिट करण्यात आली आहे. मार्चअखेरच्या तुलनेत यंदा किमती साडेतीन पट आणि गेल्या वर्षी ऑगस्ट 2021 च्या तुलनेत 6 पट वाढल्या आहेत.
गेलकडून सिटी गॅस कंपन्यांना स्थानिक आणि इंपोर्टेड एलएनजी मिक्स करून मिश्रित गॅस पुरवले जाते. गेलने गॅसच्या दरात वाढ केल्यानंतर सिटी गॅस कंपन्या सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढवण्याची घोषणा करू शकतात, असे म्हटले जात आहे. लखनऊमध्ये ग्रीन गॅस लिमिटेडने अशाच प्रकारे सीएनजीची किंमत प्रति किलो 5.3 रुपयांनी वाढवून 96.10 रुपये प्रति किलो केली आहे.
74 टक्के महाग झाले CNG!
यापूर्वी स्वस्त घरगुती नॅच्युरल गॅसमुळे महागड्या पेट्रोल डिझेलच्या तुलनेत सीएनजी पीएनजीची किंमत कमी ठेवण्यात यश आले होते. मात्र गॅसच्या वाढत्या किमतींनी लोकांचे बजेट बिघडले आहे. गेल्या वर्षभरात दिल्लीत 74 टक्के आणि मुंबईत 62 टक्क्यांनी सीएनजी महागला आहे. गेल्या वर्षी नॅच्युरल गॅसची किंमत प्रति युनिट 1.79 डॉलर होती, जी एप्रिलमध्ये 6.1 डॉलर प्रति युनिट आणि ऑगस्टमध्ये 10.5 डॉलर प्रति युनिट झाली आहे.