अमेरिकेचे अब्जाधीश जॉर्ज सोरोस अडचणीत आले आहेत. त्यांची एक संस्था ओपन सोसायटी फाऊंडेशन जगभरातील कार्यालये बंद करत सुटली आहे. तसेच ४० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची तयारी सुरु केली आहे.
ब्लूमबर्गनुसार फाऊंडेशन आफ्रिकेतील जवळपास अर्धा डझन कार्यालये बंद करत आहे. याचबरोबर बाल्टीमोर आणि बार्सिलोनामध्ये देखील कार्यालये बंद करण्याची तयारी सुरु आहे. लहान कार्यालये चालवण्यासाठी त्यांच्याकडे बँडविड्थ नसल्याचे फाउंडेशनचे म्हणणे आहे. आदिस अबाबा, कंपाला, केप टाउन, किन्शासा, अबुजा आणि फ्रीटाऊन येथील फाउंडेशनची कार्यालये बंद केली जात आहेत.
फाऊंडेशनचे नेतृत्व आता सोरोस यांचा ३७ वर्षीय मुलगा सांभाळत आहे. एलेक्स याला गेल्या डिसेंबरमध्येच अध्यक्ष बनविण्यात आले होते. तीन वर्षांत दुसऱ्यांदा या ना नफा संस्थेची पुनर्रचना केली जात आहे. 92 वर्षीय सोरोस यांना जगातील अनेक देशांच्या राजकारण आणि समाजावर प्रभाव टाकण्यासाठी स्वत:चा अजेंडा चालवणारी व्यक्ती म्हणून ओळखले जाते. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांचे देखील ते कट्टर टीकाकार आहेत.
मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हुकूमशाही व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे, असेही ते म्हणाले होते. तसेच कलम ३७० हटवण्यास आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यालाही सोरोस यांनी उघडपणे विरोध केला होता. भारतीय अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी आणि अनिल अग्रवाल यांच्यावरही आरोप केले होते.