ग्रेटर नॉयडा : आम्ही सत्तेवर आल्यापासूनच्या गेल्या ५५ महिन्यांत स्वयंपाकाचा गॅस सुमारे आणखी ४० टक्के घरांपर्यंत पोहोचविल्यानंतर सरकार आता लवकरच सगळ्या घरांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देईल, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. ते येथे सुरू असलेल्या पेट्रोटेक २०१९ परिषदेत बोलत होते.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, आता देशातील तब्बल ९0 टक्के घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस पोहोचला आहे. ही आकडेवारी २०१४ मध्ये ही केवळ ५५ टक्के होती. लवकरच भारतातील सगळी घरे स्वयंपाकाच्या स्वच्छ इंधनाने जोडतील. हे इंधन एलजीपी, तसेच बायो-मास या पर्यायी स्रोतापासूनचा वायू (गॅस) असेल.
ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी वापरले जाणारे सरपण किंवा गोवऱ्या यांची जागा स्वयंपाकाच्या गॅसने घ्यावी, असा योजनेमागे उद्देश आहे. सरपण किंवा गोवºयांमुळे स्वयंपाक करणाºयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, तसेच पर्यावरणाचेही मोठे नुकसान होते.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत तेल आणि वायू विभागाचे योगदान महत्त्वाचे असून, २०१७ मध्ये एनर्जी मिक्समध्ये त्याचा वाटा ५५ टक्के होता. जगात भारत अमेरिका आणि चीननंतर पेट्रोलियम उत्पादने आणि कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. जगात तेलाच्या एकूण वापरात भारताचा वाटा ४.५ टक्के आहे.
८ कोटी कनेक्शन्स
घरोघर स्वयंपाकाचा गॅस पोहोचला याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला जाते, असे सांगून पेट्रोलियममंत्री म्हणाले की, ही योजना गरीब कुटुंबाला स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी विनामूल्य उपलब्ध करून देते. पीएमयूवायअंतर्गत १ मे २०१६ रोजी ही योजना सुरू झाल्यापासून ६.४ कोटी गॅस जोडण्या दिल्या गेल्या आहेत. आम्ही ३१ मार्च, २०२० पर्यंत आम्ही पीएमयूवायअंतर्गत ८ कोटी घरांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देऊ.
प्रत्येक घरात लवकरच स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन : धर्मेंद्र प्रधान
आम्ही सत्तेवर आल्यापासूनच्या गेल्या ५५ महिन्यांत स्वयंपाकाचा गॅस सुमारे आणखी ४० टक्के घरांपर्यंत पोहोचविल्यानंतर सरकार आता लवकरच सगळ्या घरांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देईल, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 01:14 AM2019-02-12T01:14:22+5:302019-02-12T01:15:06+5:30