व्होडाफोन-आयडियाच्या २६ कोटींहून अधिक ग्राहकांना पुढील काही महिन्यांत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कर्जबाजारी कंपनीला नोव्हेंबरपासून सेवा बंद करावी लागू शकते. इंडस टॉवर्स कंपनीने टॉवरचा वापर करणाऱ्या व्होडाफोन-आयडियाने कर्जाची परतफेड न केल्यास सेवा बंद करण्याची धमकी दिली आहे.
व्होडाफोन-आयडिया सेवा बंद होण्याची शक्यता तूर्तास तरी खूप कमी आहे. मात्र, असा निर्णय झाल्यास सात हजार कोटी रुपये मिळणे इंडस टॉवरसाठी अडचणीचे ठरू शकते. यामुळे दोन्ही कंपन्यांकडून ठरावीक रक्कम देण्यासाठी तोडगा निघू शकतो. व्होडाफोन-आयडियावर ७,००० कोटींहून अधिकचे कर्ज आहे. या कंपनीत भारती एअरटेलचा सर्वाधिक ४७.७६ टक्के हिस्सा आहे आणि व्होडाफोन ग्रुपचा २१.०५ टक्के हिस्सा आहे. व्होडाफोन-आयडियाकडे देखील यापूर्वी इंडस टॉवर्समध्ये ११.५ टक्के हिस्सेदारी होती, परंतु दोन वर्षांपूर्वी जेव्हा भारती इन्फ्राटेलमध्ये इंडस टॉवर्स विलीन केले होते तेव्हा त्यांनी हा भाग विकला होता.
कंपनीवर १.९९ लाख कोटींचे कर्ज
व्होडाफोन-आयडियावर ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण १,९४,७८० कोटी रुपयांचे कर्ज होते. एप्रिल-जून २०२२ च्या तिमाहीअखेर हे कर्ज १,९९,०८० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
ग्राहकांमध्ये होतेय घट
दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओचा दबदबा वाढत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार, वोडाफोन-आयडिया कंपनीच्या १५.४ लाख ग्राहक जुलैमध्ये कंपनीचे नेटवर्क सोडले आहे. यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या २५.५१ कोटींवर आली आहे.
कोणत्या कंपनीचे किती ग्राहक (कोटीमध्ये)
रिलायन्स जिओ - ४१.५९
एअरटेल - ३६.३४
व्होडाफोन आयडिया - २५.५१