एव्हरेस्टवर चढाई करणं गिर्यारोहकांना आता महागात पडणार आहे. नेपाळ सरकारनं सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली. 2025 पासून माउंट एव्हरेस्ट चढण्याची परवानगी मिळविण्यासाठी रॉयल्टी शुल्क 15,000 डॉलर्सपर्यंत वाढविण्याचा विचार नेपाळ सरकार करत आहे. या शुल्कात वाढ करून सरकार गिर्यारोहणासाठी पोर्टर्स, कामगार आणि मार्गदर्शकांसाठी विमा, पगार आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. अनेक एजन्सीजनं 2024 चं बुकिंग आधीच घेतलं आहे, त्यामुळे त्यांना हा अतिरिक्त वेळ दिला जात आहे.
आता 11 हजार डॉलर्स शुल्क
सध्या माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी गिर्यारोहकांना 11 हजार डॉलर्सचं रॉयल्टी शुल्क द्यावं लागत आहे. तर नेपाळी गिर्यारोहकांसाठी 75 हजार नेपाळी रुपयांचं शुल्क द्यावं लागतं. सरकारनं यापूर्वी जानेवारी 2015 मध्ये रॉयल्टी शुल्कात बदल केला होता.
पर्यटन विभागानं 2025 पासून माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांन 15 हजार अमेरिकन डॉलर्सचं नवं रॉयल्टी शुल्क प्रस्तावित केलं आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर नवं शुल्क लागू केलं जाईल, असं विभागाचे प्रवक्ते युवराज खातीवाडा यांनी सांगितलं.
2015 मध्ये शुल्कात बदल
सध्या परदेशी गिर्यारोहकांना 11 हजार डॉलर्सचं शुल्क भरुन साऊथ फेसहून माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्याची परवानगी दिली जाते. 2015 पूर्वी समूह मोहिमांमध्ये प्रति व्यक्ती 10 हजार डॉलर्स खर्च करावे लागत होते. परंतु नंतर ही तरतूद हटवण्यात आली आणि प्रत्येक परदेशी गिर्यारोहकांना 11 हजार डॉलर्सचं समान शुल्क लागू करण्यात आलं.