डॉ. पुष्कर कुलकर्णी
आठवड्याच्या अखरेच्या दिवशी शेअर बाजार जबरदस्त आपटला. सेन्सेक्स १६८७.९४ (२.८७%) ने खाली येऊन ५७१०७.१५ वर बंद झाला आणि निफ्टी ५०९.८० (२. ९१%) ने खाली येऊन १७०२६. ४५ वर बंद झाला.
शेअर बाजार हा सेंटीमेंट्स वर प्रतिसाद देत असतो. कोरोना जेंव्हा सुरु झाला तेव्हा निफ्टी ने २४ मार्च २०२० रोजी ७५११ हा तळ गाठला होता. त्यानंतर बाजाराने एकतर्फी वाढ पहिली. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारात पैसे गुंतवले. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी निफ्टी ने १८६०४ ही उच्चांकी पातळीही गाठली. या उच्चांकी पातळीही नंतर बाजारात करेक्शन येणे स्वाभाविक आहे आणि करेक्शनसाठी बाजार कारणेही शोधत असतो. आज फक्त भारतीय बाजाराचं नव्हे तर अमेरिकी, युरोपिअन आणि आशियाई बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
काय करणे आहेत या घसरणीची?
१. कोरोना नवीन व्हेरिएन्ट - कोरोनाचा नवीन व्हेरिएन्ट आला आहे आणि त्यामुळे जागतिक बाजारात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युरोप मधील काही देशात पुन्हा लॉक डाऊन किंवा बरेच कडक निर्बंध लागू केले जात आहेत. अमेरिकेत सुद्धा गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रूग्णांममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
२. जागतिक शेअर बाजारांत अस्थिरता - जेव्हा जागतिक स्तरावर बाजार खाली येतात तेव्हा त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर सुद्धा होतात आणि आज त्याचाच मोठा परिणाम झालेला दिसत आहे.
३. वाढीसाठी पोषक वातावरण नाही - दुसऱ्या तिमाही निकालानंतर आता डिसेंबर अखेरपर्यंत भारतीय बाजारास वाढीसाठी नवा ट्रिगर कोणताही नाही.
४. विदेशी गुंतवणूकदारांची नफा वसुली - विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून नफा वसुली करून मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव वाढवला आहे. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी खाली येत आहेत.
५. कमोडिटी मार्केट वर लक्ष - नफा वसुली बरोबरच ट्रेडर्स कमोडिटी मार्केट मध्ये गुंतवणूक वाढवत आहेत . मागील काही दिवसांत सोन्याचा दर खाली आला होता. जागतिक शेअर बाजार अस्थिरतेमुळे सोन्यात गुंतवणूक करून ठेवणे हे ट्रेडर अधिक पसंत करतात.