नितीन अग्रवाल - नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील(ईपीएफ) ८.१५ कोटी खाती अनेक वर्षांपासून निष्क्रिय असून त्यातील ४० हजार कोटी रुपये दावेदारांना परत करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ईपीएफओने या पैशाबाबत संबंधितांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क तयार केले आहे. केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी आॅनलाईन पोर्टलही सुरू केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईपीएफ खात्यांमध्ये पडून असलेल्या पैशाबाबत चिंता व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचा पैसा दिला जावा या त्यांच्या आदेशानुसार ईपीएफ खातेधारकांची ओळख पटवून सर्व रेकॉर्ड आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
येत्या सहा महिन्यांत देणार पैसा
सुमारे ८.१५ कोटी खात्यांमध्ये तीनपेक्षा जास्त वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही. या खात्यांवर व्याज देणेही बंद करण्यात आले आहे. २७ ते ४० हजार कोटी रुपये जमा असून ते खऱ्या दावेदारांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यांत किंवा वर्षभरात या खात्यांतील पैसा देण्याबाबत तोडगा काढला जाईल, असे केंद्रीय भविष्य आयुक्त के.के. जालान यांनी सांगितले.
ओळख पटविण्याचे काम सुरू
खास स्थापन करण्यात आलेले हेल्पडेस्क खात्यांची ओळख पटविण्याचे काम करेल. खात्यांची ओळख आणि खातेधारकांची माहिती याची ओळख पटल्यानंतर भविष्य निर्वाह निधीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. खातेधारकांना आपला पीएफ क्रमांक द्यावा लागेल. कर्मचाऱ्यांना त्यांच्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल.
ईपीएफओ संचालन करीत असलेल्या निष्क्रिय खात्यांची माहिती दस्तऐवजातून मिळवून संगणकीकरण करण्याच्या कामाला वेग दिला जात आहे.
निष्क्रिय खात्यांमधील २.५ कोटी खात्यांमध्ये २०० रुपयांपेक्षाही कमी पैसे असल्याची माहिती मिळाली आहे.
ज्यांच्या घामाचा पैसा निष्क्रिय खात्यांमध्ये पडून आहे, अशा खातेधारकांची ओळख पटवून देण्याच्या कामी कामगार संघटना मदत करतील, असे भारतीय मजदूर संघाचे सचिव व्ही. राधाकृष्णन यांनी नमूद केले.
बंद पीएफ खाती खुली होणार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील(ईपीएफ) ८.१५ कोटी खाती अनेक वर्षांपासून निष्क्रिय असून त्यातील ४० हजार कोटी रुपये दावेदारांना परत करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
By admin | Published: February 20, 2015 12:58 AM2015-02-20T00:58:40+5:302015-02-20T00:58:40+5:30