Rahul Gandhi On Gautam Adani: देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील एका न्यायालयात कथितरित्या लाच आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आलेत. ब्लूमबर्गनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. गौतम अदानीयांच्यासह सात जणांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आलेत. यानंतर लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
"देशात मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवले जात आहे पण अदानींना काहीही होत नाही. हे उद्योजक पंतप्रधान मोदींना पूर्ण पाठिंबा देत आहेत. पंतप्रधान मोदी सतत त्यांचा बचाव करत आहेत," असं राहुल गांधी म्हणाले. अदानी यांना अटक करण्यात यावी. परंतु त्यांना अटक केली जाणार नाही, असंही ते म्हणाले.
सरकारकडून कारवाई नाही
"सरकार अदानींविरोधात कारवाई करत नाही. कोणीही गुन्हा केला तर त्याला तुरुंगात पाठवलं जातं. आता अमेरिकन एजन्सीनं त्यांनी गुन्हा केल्याचं म्हटलंय. त्यांनी भारतात लाच दिली. पंतप्रधानांना काही करायची इच्छा असेल तरीही ते करू शकणार नाहीत. पंतप्रधान मोदी हे अदानींच्या कंट्रोलमध्ये आहेत," असा आरोप राहुल गांधींनी केला. त्यांनी २००० कोटी रुपयांचा घोटाळा केलाय, पण त्यांचं काहीही होणार नाही, असंही ते म्हणाले.
जेपीसीद्वारे तपास व्हावा
ज्या राज्यांमध्ये अदानी समूहासोबत करार झालेत, त्यांचा तपास झाला पाहिजे. याचा जेपीसीद्वारे तपास झाला पाहिजे. अदानींच्या या भ्रष्टाचाराबद्दल मी बोलत नाही, अमेरिकन एजन्सीनं तपासात या गोष्टी नमूद केल्या असल्याचंही राहुल गांधी म्हणाले.