Join us

Coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा! ९७ टक्के कुटुंबांची कमाई घटली; १ कोटी रोजगार गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 2:44 PM

Coronavirus: एका अहवालानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील तब्बल १ कोटी रोजगार बुडाले असून, सुमारे ९७ टक्के कुटुंबांची मिळकत घटली, असे सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्दे९७ टक्के कुटुंबांची कमाई घटली१ कोटी रोजगार गेलेग्रामीण भागापेक्षा शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण अधिक

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कमी होताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटताना दिसत असली, तरी मृत्यूंची संख्या आणि काळ्या बुरशीचा आजाराचे वाढते प्रमाण चिंतेत भर घालत आहेत. तर, दुसरीकडे उद्योग आणि रोजगार क्षेत्रालाही कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा बसताना पाहायला मिळत आहे. एका अहवालानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील तब्बल १ कोटी रोजगार बुडाले असून, सुमारे ९७ टक्के कुटुंबांची मिळकत घटली, असे सांगण्यात आले आहे. (cmie report says coronavirus second wave over 10 million indians have lost their jobs)

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने यासंदर्भात एक अहवाल दिला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय टाळला असला, तरी जवळपास सगळ्याच राज्यांनी कमी अधिक प्रमाणात निर्बंध लादले असून, याचा परिणाम अर्थचक्रावर झाल्याचे सांगितले जात आहे. या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी यासंदर्भातील धक्कादायक आकडेवारी दिली आहे. ते पीटीआयशी बोलत होते. 

९७ टक्के कुटुंबांची मिळकत घटली

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेने देशातील १ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण केले. यामध्ये ९७ टक्के कुटुंबांची मिळकत घटली आहे. पहिल्या लाटेतून जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दुसरी लाट आली. यातही बेरोजगारी वाढली असल्याचे दिसून आले आहे. दुसऱ्या लाटेमुळे १ कोटींपेक्षा जास्त लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच मे २०२० मध्ये लॉकडाउनमुळे बेरोजगारीचा दर २३.५ टक्क्यांवर पोहोचला होता.

संकटात दिलासा! PM आवास योजनेतून आतापर्यंत सुमारे १.२ कोटी रोजगार: रिपोर्ट

नोकरी मिळण्यात प्रचंड अडचणी

ज्या लोकांना नोकरी गमवाव्या लागलेल्या त्यांना पुन्हा नोकरी मिळवण्यात प्रचंड अडचणी येत आहे. असंघटित क्षेत्रात रोजगार निर्मिती सुरू झाली. मात्र संघटित आणि चांगल्या दर्जाच्या नोकरीच्या संधी निर्माण होण्यात साधारणतः वर्षभराचा कालावधी तरी लागतो, असे व्यास यांनी सांगितले. 

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सुमारे १ कोटी लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. यामध्ये शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण १४.७३ टक्के आहे. तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण १०.६३ टक्के आहे. तसेच एकूणच देशव्यापी बेरोजगारीचे प्रमाण ११.९० टक्के आहे, असे या अहवालात म्हटले आहे.  

टॅग्स :बेरोजगारीनोकरीव्यवसाय