Join us

CMS Info Systems : गुंतवणूकदारांचा सुस्त प्रतिसाद; लिस्टिंगनंतर शेअरमागे केवळ अडीच रुपयांचाच फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 11:36 AM

CMS Info Systems :  सीएमएस इन्फो सिस्टमची शेअर बाजारात ३१ डिसेंबर रोजी सुस्त लिस्टिंग झाली.

CMS Info Systems IPO Listing Today: देशातील सर्वात मोठी कॅश मॅनेजमेंट कंपनी सीएमएस इन्फो सिस्टम्सची (CMS Info Systems) शेअर बाजारात शुक्रवारी सुस्त एन्ट्री झाली. सीएमएस इन्फो सिस्टमचा शेअर बीएसईवर २१८.५० रुपयांच्या दरावर लिस्ट झाला. याची इश्यू प्राईज २१६ रुपये होती. ज्यांनी या आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना लिस्टिंगवर केवळ १ टक्का म्हणजेच २.५० रुपयांचाच प्रति शेअर फायदा झाला. परंतु दुपारच्या सत्रात या शेअरची किंमत वाढून २५२.३० रुपयांवर पोहोचली होती.

कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडूही सुस्त प्रतिसाद मिळाला होता. तसंच अखेरच्या दिवसापर्यंत हा आयपीओ केवळ २ पटच सबस्क्राईब झाला होता. आयपीओच्या अखेरच्या दिवशी क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सनं (QIB) आणि रिटेल गुंतवणूकदारांना थोडा प्रतिसाद दिला होता.

सीएमएस इन्फो सिस्टमचा आयपीओ ३.७५ कोटी इक्विटी शेअर्सचा होता. यासाठी त्यांना ७.३२ कोटी इक्विटी शेअर्सची बोली मिळाली. रिटेल गुंतवणूकदारांनी आपल्या हिस्स्याच्या शेअर्ससाठी २.१५ पट अधिक बोली लावली होती. तर नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सनं आपल्या हिस्स्याच्या शेअर्ससाठी १.४५ पट बोली लावली होती.

२००८ मध्ये कंपनीची सुरुवात२००८ मध्ये सुरू झालेल्या सीएमएस इन्फो सिस्टम कंपनीची गणना देशातील सर्वात मोठ्या कॅश मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये होते. या आयपीओच्या माध्यमातून ११०० कोटी रुपये जमवण्याची कंपनीची योजना होती. हे पूर्णपणे ऑफर फॉर सेल होते. हे ऑफर फॉर सेल कंपनीचे प्रमोटर सियॉन इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स पीटीआय लिमिटेडद्वारे आणण्यात आले होते. सीएमएस इन्फो सिस्टम ही कंपनी भारतात बँक, फायनॅन्शिअल इन्स्टिट्युशन्स, ऑर्गनाईज्ड रिटेल आणि ई कॉमर्स कंपन्यांसाठी इन्स्टॉलिंग, देखरेख आणि असेट्स व टेक्नॉलॉजी सोल्यूशन्सच्या व्यवस्थापनाच्या कामाशी जोडलेली आहे.

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक