मुंबई: महानगर गॅसने २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री सीएनजी आणि पीएनजी दराच्या मूळ किमतीत वाढ केली असून, ती शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. ही वाढ सीएनजी प्रतिकिलो ३ रुपये ६ पैसे आणि पीएनजी प्रतिकिलो २ रुपये ६ पैसे अशी आहे. त्यानुसार, सीएनजीच्या सर्व करांसहित सुधारित वितरण किंमत ६१ रुपये ५० पैसे प्रतिकिलो, तर देशांतर्गत पीएनजी किंमत मुंबई आणि आसपास ३६ रुपये ५० पैसे अशी असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी वाढ आहे.
घरगुती गॅस वाटपातील कमतरता भरून काढण्यासाठी एमजीएल सीएनजी आणि देशांतर्गत पीएनजी विभागांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारातून अतिरिक्त नैसर्गिक वायू मिळवीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे एमजीएलच्या इनपुट गॅसच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. गॅसच्या इनपुट खर्चातील वाढ अंशतः भरून काढण्यासाठी सीएनजीच्या मूळ किमतीत वाढ केली जात आहे.