मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये उद्यापासून म्हणजेच ९ जुलैपासून वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. आज रात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू होणार आहेत. सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार आहे.
मुंबईत सीएनजी-पीएनजी गॅस पुरवणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. आज रात्रीपासून नवे दर लागू होणार आहे. सीएनजीच्या दरामध्ये दीड रुपयांनी वाढ होणार असून मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये मोजावे लागणार आहे. तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार असून पीएनजीचा दर ४७ रुपयांवरून ४८ रुपये इतका होणार आहे.
दरम्यान, सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ होणार असल्यामुळे आता मुंबईतील वाहनधारकांना याचा मोठा फटका बसणार आहे. आता सीएनजीच्या खरेदीसाठी वाहनधारकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. तसेच, सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास देखील महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.