मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सीएनजीच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली आहे. तर, पीएनजीच्या दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ मंगळवारी रात्रीपासून लागू झाली आहे. ग्राहकांना आता सीएनजीसाठी प्रति किलोमागे ८० रुपये मोजावे लागणार असून, पीएनजीसाठी ४८ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत.
स्थानिक पातळीवर गॅस पुरवठ्यात कमतरता निर्माण झाल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. देशांतर्गत गॅसच्या किमती वाढल्या आहेत. वाढत्या किमतीचा कंपनीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे, असे कंपनीने प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.