Join us  

CNG-PNG च्या दरात पुन्हा वाढ, मुंबईकरांना दुहेरी झटका; पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 8:19 AM

सीएनजीचे दर आता पेट्रोलच्या दरांच्या जवळ पोहोचले आहेत. आठ महिन्यांत सीएनजीच्या दरात ३० रुपयांची झाली वाढ.

महागाईमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्याचं सत्र सुरूच आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर मुंबईकरांना दुहेरी झटका लागला आहे. सीएनजी पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर रात्री १२ वाजल्यापासून लागू करण्यात आलेत. महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या दरात ३.५ रूपये प्रति किलोनं वाढ केली आहे. तर पीएनजीच्या किंमतीत दीड रुपयांची वाढ करण्यात आलीये.

महानगर गॅस लिमिटेडनं शुक्रवारी सीएनजी पीएनजीच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. हे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. वाढत्या खर्चाचं कारण देत एमजीएलनं ही वाढ केली आहे. या शिवाय कमी पुरवठा हेदेखील दरवाढीचं मोठं कारण आहे. आता मुंबईत सीएनजीमध्ये झालेल्या ३.५ रूपयांच्या वाढीनंतर हे दर ८९.५० रूपयांवर पोहोचले आहेत. यासोबतच १.५ रूपयांच्या वाढीनंतर पीएनजीचे दर वाढून ५४ रूपये प्रति एससीएमवर गेले आहेत.

ऑक्टोबरमध्येच झाली होती वाढयापूर्वी ऑक्टोबर महिन्यात दरवाढ करत महानगर गॅस लिमिटेडनं मुंबईकरांना झटका दिला होता. गेल्या महिन्यात सीएनजीच्या दरात ६ रुपये प्रति किलोनं वाढ करण्यात आली होती. तर पीएनजीच्या दरात ४ रूपये प्रति एससीएमनं वाढ केली होती. यानंतर सीएनजीचे दर ८६ रूपये प्रति किलो, तर पीएनजीचे दर ५२.५० रूपये प्रति एससीएमवर पोहोचले होते.

८ महिन्यांत ३० रूपयांची वाढएप्रिल महिन्यात सीएनजीचे दर ६० रुपये प्रति किलो होते. परंतु त्यात आता ३० रूपयांची वाढ होऊन ते ८९.५० रूपयांवर पोहोचले आहेत. तर पीएनजीच्या किंमतीत ३६ रूपये प्रति एससीएमची वाढ झाली असून ते आता ५४ रूपये एससीएमवर पोहोचलेत. दरम्यान एपीएमनं गॅसच्या पुरवठ्यात १० टक्क्यांची कपात केली आहे. यानंतर मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक खर्च करून बाहेरून इंधन मागवावं लागत असल्याची माहिती महानगर गॅस लिमिटेडकडून देण्यात आलीये.

टॅग्स :पेट्रोलमुंबई