cng price hike : सर्वसामान्यांची अवस्था सध्या दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायेत म्हणून लोक सीएनजीकडे वळले. तर आता तिथेही भाववाढ होत आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) CNG च्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. २२ नोव्हेंबरपासून नवीन दर लागू झाले असून, त्यानंतर मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर ७७ रुपये प्रति किलो झाला आहे. या वाढीमुळे सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांच्या खर्चात वाढ झाली आहे.
या घोषणेचा थेट परिणाम महानगर गॅस लिमिटेडच्या शेअर्सवरही दिसून आला. एमजीएलच्या शेअर्समध्ये सुमारे ३% ची वाढ नोंदवली गेली. शेअर्स १,१६० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत. घरगुती गॅस वाटप कमी करण्याच्या सरकारच्या नुकत्याच निर्णयानंतर ही वाढ झाली आहे, ज्यामुळे कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
सरकारच्या निर्णयानंतर भाववाढ
सरकारने शहर गॅस वितरण कंपन्यांसाठी प्रशासकीय किंमत यंत्रणा (APM) गॅस वाटप २०% ने कमी केले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही कपात करण्यात आली आहे. या पाऊलामुळे एमजीएल आणि आयजीएलसारख्या कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
भविष्यात सीएनजीची किंमती आणखी वाढणार
सध्या सीएनजीच्या किमतीत २ रुपयांची वाढ सुमारे २.६% इतकी आहे. तज्ञांच्या मते, एपीएम गॅस वाटपातील कमतरता भरून काढण्यासाठी सीएनजीच्या किमती ८-१०% वाढवाव्या लागतील. लवकरच इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) देखील किमती वाढवण्याची शक्यता आहे.
ग्राहकांवर बोजा वाढणार
या वाढीमुळे सीएनजी वाहन चालकांच्या खिशाला थेट फटका बसणार आहे. ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संचालन खर्चात वाढ झाल्याने भाडे वाढण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहक आणि व्यावसायिकांसमोर ही वाढ आणखी एक आव्हान म्हणून समोर आली आहे.