नवी दिल्ली : सहकारी सोसायट्या या बँका नसून नागरिकांनी अशा सोसायट्यांसोबत बँकिंग व्यवहार करू नयेत, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने नागरिकांना केले आहे.रिझर्व्ह बँकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकिंग नियमन कायदा १९४९ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर २०२० रोजी अंमलात आलेल्या नवीन ‘बँकिंग नियमन (सुधारणा) कायदा २०२०’ नुसार सहकारी सोसायट्या आपल्या नावात बँक, बँकर अथवा बँकिंग हे शब्द वापरू शकत नाहीत. बीआर कायदा १९४९ अन्वये ज्यांना परवानगी दिलेली आहे, त्याच संस्था हे शब्द आपल्या नावात वापरू शकतात.काही सहकारी सोसायट्या बिगर-सदस्य लोक, नामधारी सदस्य आणि सहयोगी सदस्य यांच्याकडून ठेवी स्वीकारत आहेत. अशा प्रकारे ठेवी स्वीकारणे हे बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचा भंग करणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा संस्थांशी बँकिंग व्यवहार करू नयेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, या सोसायट्यांतील ठेवींना ‘ठेवी विमा व कर्ज हमी महामंडळा’ची विमा सुरक्षा उपलब्ध नाही.
- रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, कोणतीही सहकारी संस्था बँक असल्याचा दावा करीत असेल तर, अशा संस्थेशी व्यवहार करताना तिच्याकडे रिझर्व्ह बँकेने जारी केलेला बँकिंग परवाना आहे का, याची खातरजमा करून घ्यावी.