नवी दिल्ली : इन्फोसिसचे (Infosys) माजी अध्यक्ष रवी कुमार एस (Ravi Kumar S) यांनी कॉग्निझंट ( Cognizant) या आयटी कंपनीचे सीईओ आणि बोर्ड सदस्य म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी ब्रायन हम्फ्रीज यांची जागा घेतली आहे. कॉग्निझंट कंपनीने रवी कुमार एस यांना भरघोस पगाराच्या पॅकेजवर सीईओची जबाबदारी दिली आहे. रवी कुमार एस यांचा वार्षिक पगार इतका आहे की, ते रोज एक नवीन थार कार खरेदी करू शकतात. रवी कुमार एस जवळपास 20 वर्षे इन्फोसिसमध्ये होते. 2016 ते 2022 पर्यंत इन्फोसिसचे रवी कुमार एस अध्यक्ष होते. आता कॉग्निझंटला नवी दिशा देण्याची जबाबदारी रवी कुमार एस यांच्या खांद्यावर आहे.
रवी कुमार एस कॉग्निझंटमध्ये भरघोस पगारावर काम करतील. कॉग्निझंटमध्ये त्यांना 7 मिलियन डॉलर म्हणजेच वार्षिक पगार म्हणून 56,96,77,500 रुपये दिले जातील, तसेच, त्यांना साइन इन बोनस म्हणून 6 कोटी रुपये मिळतील. रवी कुमार एस यांना बेसिक पगार म्हणून कॉग्निझंट कंपनी 1 मिलियन डॉलर म्हणजेच 8,18,03,550 रुपये देईल. त्यांना 2 मिलियन डॉलर म्हणजेच वार्षिक 163,607,100 पर्यंत कॅश इन्सेंटिव्ह देखील मिळेल. याशिवाय, कंपनीने त्यांना 5 मिलियन डॉलर म्हणजेच 409,017,750 कोटी रुपयांचा वन टाइम न्यू हायर अॅवार्ड म्हणून ऑफर केली आहे. ते रुजू झाल्यानंतर एक वर्षाच्या आत स्टॉक रिटर्नच्या आधारावर दिले जाईल.
इन्फोसिसशिवाय रवी कुमार एस यांनी भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर, ओरॅकल कॉर्पोरेशन आणि प्राइसवॉटरहाऊस कूपर्समध्येही काम केले आहे. सध्या ब्रायन हम्फ्रीज 15 मार्चपर्यंत कॉग्निझंटमध्ये विशेष सल्लागार म्हणून राहतील. 2020 मध्ये कंपनीने सीईओ ब्रायन हम्फ्रीज यांना जवळपास 13.8 मिलियन डॉलर इतका पगार दिला होता. इन्फोसिसमध्येही रवी कुमार एस यांना तगडा पगार मिळत होता. इन्फोसिसच्या 2021-22 च्या वार्षिक रिपोर्टनुसार, रवी कुमार एस हे सीईओ सलील पारेख आणि माजी सीओओ यूबी प्रवीण राव यांच्यानंतर कंपनीचे तिसरे सर्वाधिक पगार घेणारे अधिकारी होते.
मोठ्या पगारासह आव्हानेही आहेत मोठी
कॉग्निझंटच्या इन-डिमांड सॉल्यूशन्स आणि इंटरनॅशनल एक्सपेंशनसाठी रवी कुमार एस यांच्याकडे प्रमुख जबाबदाऱ्या आहेत. इन्फोसिसमध्ये असताना रवी कुमार एस यांनी मोठे यश मिळवले होते. आता कॉग्निझंटमध्येही त्यांना यश मिळवण्यासाठी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. रवी कुमार एस यांनी शिवाजी विद्यापीठातून बॅचलरची पदवी घेतली आहे. तर त्यांनी झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी घेतली आहे. कॉग्निझंटमध्ये सीईओ म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल रवी कुमार एस म्हणाले की, "मी कॉग्निझंटला आपल्या व्यवसायात मूलभूतपणे बदल करताना, डिजिटल पोर्टफोलिओ आणि क्षमता वाढवताना, ग्राहक संबंध आणि भागीदारी मजबूत करताना पाहिले आहे. याला नवी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न असेल."