अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी कॉग्निझंटनं (Cognizant) भारतीय टेक कंपनी इन्फोसिस (Infosys) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कॉग्निझंटने टेक्सास फेडरल कोर्टात हा खटला दाखल केलाय. कॉग्निझंटनं इन्फोसिसवर हेल्थकेअर इन्शुरन्स सॉफ्टवेअरशी संबंधित ट्रेड सीक्रेट चोरल्याचा आरोप केलाय. इन्फोसिसनं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
इन्फोसिसनं काय म्हटलं?
कॉग्निझंटनं केलेल्या आरोपांना इन्फोसिसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कंपनीला या प्रकरणाची माहिती आहे. कंपनी न्यायालयात आपली बाजू मांडणार असल्याचं कंपनीनं म्हटलं. इन्फोसिसच्या प्रवक्त्यानेही कॉग्निझंटनं केलेले आरोप फेटाळून लावलं आहेत.
काय आहे प्रकरण?
इन्फोसिसनं बेकायदेशीरपणे त्यांच्या डेटाबेसमधील डेटा चोरल्याचा आरोप कॉग्निझंटनं केलाय. या माहितीच्या आधारे त्यांनी नवं सॉफ्टवेअर विकसित केलंय. कॉग्निझंटच्या तक्रारीनुसार, इन्फोसिसनं ट्रायझेटो सॉफ्टवेअर डेटाचा गैरवापर केला. याशिवाय इन्फोसिसने क्यूएनएक्सटीमधून डेटा काढला असून हे नियमांचं उल्लंघन आहे, असं कंपनीनं म्हटलंय आहे.
काल बीएसईमध्ये इन्फोसिसचा शेअर जवळपास १ टक्क्यांनी घसरून १८६२.३५ रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षभरात इन्फोसिसच्या शेअरच्या किमती तब्बल ३२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १९०३ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १३५२ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ७,७३,२६९.१३ कोटी रुपये आहे.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)