Salary in Cognizant : देशात अनेक IT कंपन्या आहेत, ज्या कॉलेज पास झालेल्या इंजिनीअरिंग फ्रेशर्स विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी देतात. पण, सध्या देशातील आघाडीची IT कंपनी Cognizant इंजिनीअरिंग फ्रेशर्सना कमी पगार दिल्यामुळे चर्चेत आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून लोक सातत्याने कंपनीवर टीका करत आहेत. पण, आता याप्रकरणी कंपनीनी आपली बाजू मांडली आहे.
कंपनीवर इंजिनीअरिंग फ्रेशर्सना फक्त 2.52 लाख रुपये पगार ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर कंपनीला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. यानंतर कंपनीने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून, ही ऑफर नॉन-इंजिनीअरिंग पदवीधारकांसाठी असल्याचे म्हटले आहे. तसेच, इंजिनीअरिंग फ्रेशर्सना 4 ते 12 लाख रुपये वार्षिक पगार देत असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाची माहिती देताना कॉग्निझंटचे अमेरिका ईव्हीपी आणि अध्यक्ष सूर्या गुम्माडी यांनी सांगितले की, आम्ही ज्या पदासाठी 2.52 लाख रुपये पगार देऊ केला होता, ते नॉन-इंजिनीअरिंग पोस्टसाठी होते. इंजिनीअरिंग पदवीधरांना इतके कमी वेतन दिले जात नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारी तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहेत. कंपनी इंजिनीअरिंग पदवीधरांना 4 ते 12 लाख रुपये वार्षिक वेतन देते. पगार हा व्यक्तीचे कौशल्य, श्रेणी इत्यादींवर अवलंबून असतो.
पगारवाढीवरही कॉग्निझंटची टीकायापूर्वी कॉग्निझंटला कर्मचाऱ्यांच्या कमी पगारवाढीवरुन लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. या आर्थिक वर्षात कंपनीने 1 ते 5 टक्के वाढ जाहीर केली होती. कर्मचाऱ्यांना किती वेतनवाढ मिळणार हे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर अवलंबून असल्याचे म्हटले होते. यानंतर इतकी कमी वेतनवाढ दिल्याबद्दल कंपनीला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले.