जगभरातील मोठ्या कंपन्यांनी जागतिक मंदीचे कारण देत आतापर्यंत आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र, अद्यापही कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू असून दर काही दिवसांनी नवीन कंपनीचे नाव जोडले जात आहे. यामध्ये आता कॉग्निझंट (Cognizant) कंपनीचाही समावेश झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणार आहे.
दिग्गज आयटी कंपनी कॉग्निझंटने 3,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, खर्च कमी करण्यासाठी कंपनी आपली काही कार्यालयेही बंद करणार आहे. कॉग्निझंट ही अमेरिकन कंपनी आहे. परंतु तिच्या कामकाजाचा मोठा भाग भारतात आहे. अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये असलेल्या मंदीचा परिणाम आयटी कंपन्यांच्या कमाईवर झाला आहे. कॉग्निझंटमध्ये सध्या 3 लाख 55 हजार 300 कर्मचारी आहेत.
सीईओ रवी कुमार यांनी खर्च कमी करण्यासाठी हजारो कर्मचार्यांची कपात करण्याची आयटी प्रमखुची योजना मांडली. एवढेच नाही तर खर्च कमी करण्यासाठी कंपनी आपली काही कार्यालयेही बंद करणार आहे. कंपनी 11 दशलक्ष चौरस फूट ऑफिसची जागा सुद्धा रिकामी करणार आहे. दरम्यान, कॉग्निझंटने वार्षिक आधारावर नफ्यात किरकोळ 3 टक्के वाढ नोंदवली आहे. तसेच, कंपनीचा महसूल 4.81 अब्ज डॉलर झाला. वर्षानुवर्षे महसूल 0.3 टक्के कमी झाला.
कॉग्निझंटने अलीकडेच जाहीर केले होते की, कंपनी कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय आपल्या माजी सीईओची हकालपट्टी केली आहे. आयटी कंपनीच्या 2023 प्रॉक्सी स्टेटमेंटचा भाग म्हणून ही घोषणा करण्यात आली होती. दुसरीकडे, सोशल मीडियातील दिग्गज कंपनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटा 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कपात या महिन्यापासून म्हणजेच मे महिन्यापासून सुरू होणार आहे.
डिस्ने 4 हजार कर्मचाऱ्यांना काढणार
अमेरिकेतील दिग्गज मास मीडिया आणि मनोरंजन कंपनी वॉल्ट डिस्नेनेही टाळेबंदीची दुसरी फेरी सुरू केली आहे. या फेऱ्यात सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील. या वर्षाच्या सुरुवातीला डिस्नेने 7,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते.