Join us

'आठवड्यातून ३ दिवस ऑफिसला या, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा,' TCS नंतर आणखी एका दिग्गज कंपनीचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 1:06 PM

आयटी क्षेत्रातील एका दिग्गज कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं आहे. तसं न केल्यास त्यांना १९ फेब्रुवारीपासून कारवाईला सामोरं जावं लागेल.

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी एचसीएल टेकनं (HCL Technologies) आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं आहे. तसं न केल्यास त्यांना १९ फेब्रुवारीपासून कारवाईला सामोरं जावं लागेल. एचसीएल टेक ही भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. इतर मोठ्या आयटी कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर, TCS ने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ५ दिवस, इन्फोसिसनं महिन्यातील १० दिवस आणि विप्रोनं आठवड्यातून ३ दिवस ऑफिसमधून काम करणं अनिवार्य केलंय. 

सर्व डीएफएस (डिजिटल फाउंडेशन सर्व्हिसेस) मग कोणताही बँड असो, कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्त केलेल्या एचसीएल टेक ऑफिसमधून आठवड्यातून किमान तीन दिवस काम करावं लागेल, असं ग्लोबल हेड - एचसीएलटेक पीपल फंक्शन डीएफएस विकास शर्मा यांनी सांगितलं. कंपनी हायब्रिड वर्क मॉडेलचं अनुसरण करत आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस कार्यालयातून काम करावं लागेल, अशी प्रतिक्रिया एचसीएलटेकच्या प्रवक्त्यांनी दिली. 

'लिव्ह विथआऊट पे'चा इशारा 

एका कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एचआर मीटिंगमध्ये एचसीएलटेक व्यवस्थापन, कर्मचारी आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात न आल्यास 'लिव्ह विथआऊट पे'चा इशारा दिला जात आहे. याशिवाय प्रोडक्टिव्हिटीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. कर्मचाऱ्यांना किमान ८ तासांची लॅपटॉप ॲक्टिव्हिटी ठेवण्यास सांगितलं जात आहे. तसं न केल्यास अडचणी वाढतील. दरम्यान, सूचनांचं पालन न केल्यास अनअथोराइज्ड अॅबसेन्स (Unauthorised Absence) मानलं जाईल आणि कंपनी धोरणानुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असं एचसीएल टेकचं म्हणणं आहे.

टॅग्स :व्यवसाय