नवी दिल्ली : मंदीमुळे सुरू झालेल्या नोकरकपातीच्या वातावरणाचा परिणाम भारतातील आयटी क्षेत्रावरही झाला आहे. दिग्गज कंपनी विप्रोने ४०० फ्रेशर्सना काढून टाकल्यानंतर आता आणखी एक धक्का दिला आहे. कंपनीने रुजू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या फ्रेशर्सना अर्ध्या पगारावर रुजू होण्यास सांगितले आहे.
उमेदवारांना ६.५ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले होते. आता विप्रोने उमेदवारांना ई-मेलद्वारे विचारले आहे की, ते ३.५ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजसह कंपनीत रुजू होण्यास तयार आहेत का?
ई-मेलमध्ये काय?आम्ही वेळोवेळी जागतिक अर्थव्यवस्था आणि ग्राहकांच्या गरजांचे मूल्यांकन करीत असतो. बदलत्या परिस्थितीत आमच्याकडे प्रकल्प अभियंत्यांसाठी ३.५ लाख रुपये वार्षिक पॅकेजसह संधी उपलब्ध आहेत. ही ऑफर विप्रोच्या आर्थिक वर्ष २०२३ बॅचमधील सर्व उमेदवारांना आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी वैध आहे. उमेदवाराने विप्रोकडून ही ऑफर स्वीकारल्यास मागील ऑफर अवैध होतील.