Join us

करदात्यांना मोठा दिलासा, इन्कम टॅक्स रिटर्नच्या आकड्यांमधील किरकोळ चूक ठरणार आता क्षम्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 11:00 PM

इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करताना सर्वसामान्य करदात्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातही टॅक्स रिटर्न भरताना...

नवी दिल्ली -  इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करताना सर्वसामान्य करदात्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातही टॅक्स रिटर्न भरताना अनावधानाने काही चुका राहून जातात. अशा चुका असल्याच प्राप्तिकर खात्याकडून करदात्यांना नोटीस बजावण्यात येत असे. मात्र आता इन्कम टॅक्स रिटर्न भरताना झालेल्या किरकोळ चुका क्षम्य ठरणार आहेत. टॅक्स रिटर्न भरताना किरकोळ चुका राहिल्यास आता प्राप्तिकर खात्याकडून नोटीस बजावण्यात येणार नाही. सेंट्रल बोर्ड ऑफ टॅक्सेसने यासंदर्भातील माहिती दिली. त्यानुसार फॉर्म-16 आणि फॉर्म 26 एएसमध्ये किरकोळ चुका असल्यास करदात्याला नोटीस देण्यात येणार नाही. पण आकडेवारीमध्ये मोठी गफलत आढळल्यास पूर्वीप्रमाणेच नोटीस बजावण्यात येईल. याआधी कुठल्याही करदात्याला बँका आणि अन्य फायनँशियल व्यवहारांच्या माहितीची आकडेवारी आयटीआरमधील माहितीसोबत जुळत नसतील तर अशा करदात्याला नोटीस पाठवण्यात येत असे. आता अशा करदात्यांना दिलासा देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी फॉर्म-16 आणि फॉर्म 26 एएसमध्ये किरकोळ चुका असल्यास करदात्याला दिलासा देण्यासाठी नुकत्याच लागू करण्यात आलेल्या फायनँन्शियल बिलामध्ये तरतूद करण्यात आली आहे.  दरम्यान, नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकराच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गतवर्षी लागू केलेला 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्नापर्यंतच्या करमुक्तीचा स्लॅब कायम आहे. त्यामुळे  या अर्थसंकल्पामधून नोकरदांराच्या पदरी निराशाच आली.  अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी 2.50 लाखांवर असणा-या कराची मर्यादा 3.50 लाखापर्यंत वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती, पण तसं काहीही न करता सरकारने कररचनेत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाची निराशा झाली आहे.  त्यामुळं नोकरदार वर्गामध्ये आनंदी वातावरण होतं. पण प्रत्येक्षात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही .  

टॅग्स :इन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालयआयकर मर्यादाअर्थसंकल्प