नवी दिल्ली : रत्न आणि दागिन्यांची निर्यात वाढविण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्क घटविले पाहिजे, असे मत वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले आहे.येथे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. आपल्या मंत्रालयाने सोन्यावरील आयात शुल्क घटविण्याचा प्रस्ताव मांडला आहे काय? असे विचारले असता त्या म्हणाल्या की, सोन्यावरील आयात शुल्क वाढविण्यात आल्याने रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीवर फार विपरीत परिणाम झाला आहे. ही निर्यात वाढविण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्क घटवावे, असे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. सोन्यावरील आयात शुल्क घटविण्याची विनंती मी वित्तमंत्र्यांना केली आहे.त्या म्हणाल्या की, भारतात सोन्याच्या आयातीवर १० टक्के शुल्क आहे. त्याचा परिणाम दागिन्यांची निर्यात करणाऱ्यांवर झाला आहे. त्यामुळेच आम्ही आयात शुल्क घटविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. आमच्या प्रस्तावावर विचार करण्यापूर्वी वित्तमंत्रालय चालू खात्यातील तुटीकडे लक्ष देऊ शकतो.रोजगाराचा विचार करता रत्न आणि दागिने निर्यातीचा व्यवसाय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यंदा ही निर्यात आॅक्टोबरमध्ये १३ टक्क्यांनी घटून ३.४८ अब्ज डॉलर झाली. आॅगस्टमध्ये सोन्याची आयात दुप्पट होऊन ४.९५ अब्ज डॉलर झाली; पण सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये त्यात पुन्हा घसरण झाली. सोन्याच्या वाढत्या आयातीचा भारताच्या चालू खात्यातील तुटीवर विपरीत परिणाम होत आहे, भारत हा सोन्याचा सर्वांत मोठा आयातदार देश आहे.
सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याची वाणिज्य मंत्रालयाची इच्छा
By admin | Published: November 25, 2015 11:18 PM