Join us

ऑक्टोबरची सुरुवात महागाईने, गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रचंड वाढ, आता मोजावे लागतील एवढे रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 8:13 AM

Commercial Gas Cylinders Rates:

दसरा, दिवाळी तोंडावर असताना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. आजपासून कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २०९ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एका गॅस सिलेंडरसाठी १७३१ रुपये मोजावे लागतील. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये २०९ रुपयांनी वाढ केली आहे. या वाढीव किमती आजपासूनच लागू होणार आहेत.

ओमसीकडून १ सप्टेंबर रोजी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १५८ रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर बरोबर महिनाभराने किमतीमध्ये ही भरमसाट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कमर्शियल सिलेंडरची किंमत १५२२ रुपयांवरून वाढून आता १७३१.५० रुपये झाली आहे. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात देशभरातील सर्व कनेक्शन धारकांसाठी घरगुती सिलेंडरच्या किमतीत २०० रुपयांची कपात केली होती. त्यानंतर महिनाभरातच कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.

कमर्शियल आणि घरगुती एलपीजी या दोन्ही सिलेंडरच्या किमतींमध्ये दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदल केला जातो. याआधी ऑगस्ट महिन्यात ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये ९९.७५ रुपयांची कपात केली होती. मात्र घरगुती सिलेंडर ग्राहकांसाठी गॅसच्या किमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर हा ९०६ रुपयांनाच मिळणार आहे.

केंद्र सरकारने ३० ऑगस्ट रोजी महागाईपासून दिलासा देण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये २०० रुपयांची कपात केली होती. त्यामुळे आधी ११०३ रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर ९०३ रुपयांना मिळू लागला होता.  

टॅग्स :गॅस सिलेंडरमहागाई