नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेने ऑक्टोबरमध्ये मोठी भरारी घेतली आहे. कोविड-१९ महामारीच्या विळख्यातून बाहेर पडत असलेल्या भारतीय वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील वृद्धीदर वाढून १३ वर्षांच्या उच्चांकावर गेला आहे.
आयएचएस मार्किट इंडियाने जारी केलेला पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ऑक्टोबरमध्ये वाढून ५८.९ अंकांवर पोहोचला. आदल्या महिन्यात तो ५६.८ अंकांवर होता. ५० अंकांच्या वरील पीएमआय तेजी, तर त्याखालील पीएमआय मंदी दर्शवितो. पीएमआयमधील वृद्धीमुळे चालू वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील एकूणच आर्थिक वृद्धीबाबत चांगले संकेत मिळत आहेत. पीएमआय अहवालानुसार, २००७ नंतरची ही सर्वोत्तम उत्पादन वृद्धी ठरली आहे, तसेच विक्रीमध्ये २००८ नंतरचा उच्चांक झाला आहे. सप्टेंबरमध्ये मोबाईल फोन, घरगुती उपकरणे आणि कार यांची मागणी वाढून अर्थव्यवस्थेला गती मिळाली होती. ऑक्टोबरमध्ये त्यात आणखी वाढ झाली. आयएसएस मार्किटच्या आर्थिक सहयोगी संचालिका पॉलियाना डे लिमा यांनी सांगितले की, कच्च्या मालाच्या खरेदीत उच्चांकी वाढ झाल्यामुळे विक्रीतील वृद्धी कायम राहील, असा विश्वास कंपन्यांमध्ये निर्माण झाल्याचे दिसून येते. कोविड-१९ निर्बंध शिथिल झाल्यानंतर नवीन मागणीची पातळी वाढली आहे.
विक्रीत सर्वाधिक वाढ
आयएचएस मार्किटचा निर्देशांक ४० उत्पादकांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. मध्यम श्रेणीतील वस्तूंच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसते. ग्राहकोपयोगी वस्तू आणि भांडवली वस्तूंची मागणीही चांगली वाढल्याचे दिसून आले आहे. कोविड निर्बंधातील शिथिलता, अधिक चांगली बाजार स्थिती आणि सुधारलेली मागणी यामुळे ऑक्टोबरमध्ये नवीन काम उपलब्ध होण्यास मदत झाली.