Join us  

दिवाळीत सर्व सामान्यांना दिलासा मिळणार, खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घट होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 10:05 AM

दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशात खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घट होणार आहे.

दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशात खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घट होणार आहे. भारतात ऑगस्ट महिन्याप्रमाणे पामतेलाच्या आयातीत ८७ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर सप्टेंबर महिन्यात १० लाख टन तेल आयात केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असेल आणि याचा परिणाम तेलाच्या किमतीवर पाहायला मिळेल. 

जुलै महिन्याच्या तुलनेत देशानं ऑगस्ट महिन्यात तब्बल ८७ टक्के अधिक तेल आयात केलं आहे. गेल्या ११ महिन्यातील ही सर्वाधिक आयात ठरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पामतेलाच्या किमतीत ४० टक्क्यांची घट झाली आहे. याचाच फायदा घेत भारतानं मोठ्या प्रमाणात तेलाची आयात केली आहे. याचा परिणाम तेलाच्या किमतीवर पाहायला मिळेल. देशातील खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घट होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीत सर्वसामान्यांना तेलाच्या किमतीबाबत मोठा दिलासा मिळू शकतो. 

आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाची किंमत १८००-१९०० डॉलर मेट्रिक टनवरुन घसरुन थेट १०००-११०० डॉलर मेट्रिक टनवर पोहोचली आहे. भारत जगभरातील सर्वात मोठ्या तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारताने जुलै महिन्याच्या तुलनेत विक्रमी तेल आयात केली आहे. ऑगस्ट महिन्यात देशात ९,९४,९९७ टन पामतेल आयात करण्यात आलं. त्याच्या तुलनेनं जुलै महिन्यात ५,३०,४२०  टन पामतेल आयात करण्यात आलं होतं. हे प्रमाण ८७ टक्क्यांनी वाढलं आहे. तर सप्टेंबर महिन्यात देशात १० लाख टन तेल आयात केलं जाऊ शकतं.

टॅग्स :तेल शुद्धिकरण प्रकल्प