Join us  

‘सीएसआर’ निधी खर्च करण्यात हात आखडता; महाराष्ट्राला बसला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 6:54 AM

कोरोना महामारीमुळे कंपन्यांच्या नफ्यात घट झाल्याचा परिणाम

हरीश गुप्तानवी दिल्ली : कोरोना काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, महाराष्ट्रामध्ये सामाजिक दायित्व उपक्रम अर्थात ‘सीएसआर’ निधी खर्च करण्यात कंपन्यांनी हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे. २०२०-२१ मध्ये राज्यात सीएसआर फंडात कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कपात केली असून, पहिल्या सहा महिन्यात केवळ ११०० कोटी  रुपये खर्च करण्यात आले आहेत. २०१९-२० मध्ये सीएसआर निधीमधून कंपन्यांनी ३,४०० कोटी रुपये खर्च केला होता.

नागपूरमध्ये २०२०-२१ च्या पहिल्या सहा महिन्यात केवळ ५.५३ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. २०१९-२० मध्ये येथे ५५.८७ कोटी रुपये सीएसआर निधी खर्च करण्यात आला होता. कंपन्यांनी २०२०-२१ च्या उर्वरित सहा महिन्याचा डेटा अद्याप जमा केलेला नाही. कोरोनामुळे कंपन्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे कंपन्यांच्या नफ्यात मोठी घट झाली. परिणामी, सीएसआर निधीमध्ये घट झाली. कंपन्यांना त्यांच्या नफ्यातील २ टक्के रक्कम सीएसआर उपक्रमासाठी खर्च करणे बंधनकारक आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कंपन्यांचा नफा दिवसेंदिवस वाढत असल्याने २०१६-१७ पासून सीएसआर खर्चात सातत्याने वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्ये सीएसआर अंतर्गत कंपन्यांनी राज्यात २,४९२ कोटी रुपये खर्च केले. तर पुढील वर्षात २,८३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. २०१८-१९ मध्ये ३,२०५ कोटी तर २०१९-२० मध्ये ३,४०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. याचा अर्थ नोटाबंदी किंवा जीएसटीचा मोठा फटका कंपन्यांच्या नफ्यावर झाला नाही. मात्र, कोरोना महामारीचा फटका कंपन्यांना बसल्याने सीएसआर खर्चात घट झाल्याचे दिसून येते. 

टॅग्स :महाराष्ट्र