लखनौ : औद्योगिक क्षेत्राकडून ‘दिवाळी गिफ्ट’चे बजेट सुमारे ३५ ते ४० टक्क्यांनी कमी करण्यात येत आहे, अशी माहिती औद्योगिक संघटना असोचेमने दिली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग क्षेत्र मंदीचा सामना करीत असल्यामुळे ही कपात होत असल्याचे असोचेमच्या अभ्यासातून समोर आले आहे.
आपले सहयोगी, नेटवर्कमधील भागीदार, कर्मचारी आणि प्रमुख व्यक्तींना कंपन्यांकडून दरवर्षी दिवाळीत भेटवस्तू दिल्या जातात. यंदा मात्र मंदीमुळे कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेल्या आहेत. एकूणच खर्चात कपात करण्याचे धोरण कंपन्या स्वीकारीत आहेत. नोटाबंदीने आधीच व्यवसायात अडथळे निर्माण झाले होते. त्यातच जीएसटी लावण्यात आला. त्यामुळे एकूणच धारणा मंदावली आहे.
असोचेमने म्हटले की, दिवाळी भेटवस्तूंचे बजेट उद्योग क्षेत्राने कमी केल्यामुळे एफएमसीजी कंपन्यांना फटका बसला आहे. दिवाळीत चॉकलेट, कुकीज आणि मिठाईच्या विक्रीतून या कंपन्यांची मोठी कमाई होते. त्यात घसरण झाली आहे.
असोचेमचे सरचिटणीस डी.एस. रावत यांनी सांगितले की, टिकाऊ वस्तू क्षेत्रातील कंपन्यांनाही फटका बसला आहे. वॉशिंग मशीन, फ्रीज, ओव्हन, इलेक्ट्रिक स्टोव्ह यासारख्या वस्तूंच्या विक्रीत घट दिसून आली आहे.
७५८ कंपन्यांशी संपर्क साधून केला सर्व्हे
रावत यांनी म्हटले की, महोत्सवी बजेटमध्ये कंपन्यांकडून कपात करण्यात येत असल्याचा कल असोचेमच्या अभ्यासात समोर आला आहे. असोचेमने दूरध्वनीद्वारे देशभरातील ७५८ कंपन्यांशी संपर्क साधून हा अभ्यास केला.
१, २ आणि ३ श्रेणीच्या शहरांतील कंपन्यांना अभ्यासात सहभागी करून घेण्यात आले होते. या शहरांत अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई यांचा समावेश आहे.
कंपन्यांचे ‘दिवाळी गिफ्ट’चे बजेट ४० टक्क्यांपर्यंत घटले, नोटाबंदी, जीएसटीचा परिणाम, असोचेमच्या सर्वेक्षणातील माहिती
औद्योगिक क्षेत्राकडून ‘दिवाळी गिफ्ट’चे बजेट सुमारे ३५ ते ४० टक्क्यांनी कमी करण्यात येत आहे, अशी माहिती औद्योगिक संघटना असोचेमने दिली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:52 AM2017-10-20T00:52:43+5:302017-10-20T00:55:15+5:30