नवी दिल्ली : खासगी कंपन्यांसाठी असलेले नियम थोडे शिथिल करीत सरकारने संचालकांना त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे स्वीकारण्याची परवानगी दिली आहे.सरकारच्या या ताज्या पुढाकाराने कंपन्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा जमा करणे थोडे सोपे होणार आहे. सरकारने यासाठी ‘कंपनी जमा स्वीकार्यता’ हा नियम शिथिल करताना कॉर्पोरेट प्रकरणांच्या मंत्रालयाने म्हटले आहे की, या स्थितीत आता कंपनीचे संचालक किंवा खासगी कंपनीच्या संचालकांच्या नातेवाईकांकडून पैसा घेऊ शकतात. मात्र, मंडळाच्या अहवालात ही बाब स्पष्ट करावी लागेल.याबाबत मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत म्हटले आहे की, कंपनीचे संचालक किंवा खासगी कंपनीच्या संचालकांचे नातलग यांच्याकडून पैसा जमा केला जाऊ शकतो. मात्र, पैसे देणाऱ्यांनी दिला जाणारा पैसा उधार किंवा जमा करण्यासाठी दिला जात नाही, हे लेखी जाहीर करावे लागेल. त्याचबरोबर घेतलेल्या पैशाचा खुलासा आपल्या मंडळाच्या अहवालात करणे आवश्यक आहे.सरकारच्या या ताज्या निर्णयाने कोणत्याही खासगी कंपनीचे संचालक किंवा त्यांचे नातलग यांच्याकडून मिळालेला पैसा ‘जमा’ या श्रेणीत राहणार नाही. १५ सप्टेंबर रोजी याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याच अधिसूचनेत ‘मुक्त कोष राखीव’चा विस्तार करण्यात आला आहे. रोखे प्रीमियम खात्याच्या त्यात समावेश करण्यात आला आहे.
नातलगांकडून पैसा जमविण्यास कंपन्यांना मुभा
By admin | Published: September 20, 2015 11:31 PM