लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/मुंबई : जीएसटीची अंमलबजावणी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचा पुरवठा कमी केला आहे. १ जुलैपासून वस्तू व सेवा कराची(जीएसटी) अंमलबजावणी होणार आहे. ही पद्धत अपडेट करण्यासाठी चार-पाच दिवस लागणार आहेत. तत्पूर्वी कंपन्या आगामी दोन-तीन दिवसांत आपल्या प्रलंबित आॅर्डर पूर्ण करणार आहेत. २५ ते ३० जूनच्या काळात कंपनीकडून होणारा पुरवठा एक तर बंद होऊ शकतो किंवा त्याची गती कमी होऊ शकते. १ जुलैपूर्वी पुरवठा केलेल्या, पण त्यानंतर विक्री होणाऱ्या उत्पादनांसाठी वितरकांना अतिरिक्त कर लागणार आहे. गोदरेज अप्लायन्सेसच्या एका वितरकाने सांगितले की, बाजारात वस्तंूचा पुरवठा कमी होण्याची शक्यता नाही. वितरकांकडे सध्या पुरेसा साठा उपलब्ध आहे. पीडब्ल्यूसी या कन्सल्टिंग फर्मचे कार्यकारी संचालक ऋतुपर्ण मुखोपाध्याय म्हणाले की, ‘इंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेअर’चे काम तीन-चार दिवसांसाठी थांबविण्यात येईल. १ जुलैपासून पुन्हा ते पूर्ववत होईल. त्यामुळे वितरण आणि अन्य कामे सात-आठ दिवसांसाठी ठप्प राहतील.’ मारिकोचे सीएफओ विवेक कर्वे म्हणाले की, या महिन्याच्या अखेरीस आम्ही उत्पादन थांबविणार नाही. चलन आणि खरेदीची प्रक्रिया जीएसटीला अनुरूप करण्यासाठी दोन-तीन दिवस लागतील. डाबरचे मुख्य आर्थिक अधिकारी ललित मलिक म्हणाले की, ‘जीएसटी लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर उत्पादनात विशेष बदल करावे लागणार नाहीत, पण काही श्रेणीतील उत्पादने मात्र घटू शकतात.’ जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी तयार असल्याचे अनेक कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
उत्पादनांचा पुरवठा कंपन्यांनी घटविला
By admin | Published: June 24, 2017 3:14 AM