Join us

मेटा, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपलसारख्या कंपन्यांना मंदीचा फटका; 32000 कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 2:17 PM

मंदीच्या शक्यतेने अनेक कंपन्यांनी नवीन भरती देखील बंद केली आहे. जाहिरातींवरील खर्चही कमी केला आहे.

जगभरात आता आर्थिक मंदीने मोठे रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना महामारी त्यानंतर रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे उद्योग धंद्यांवर प्रचंड परिणाम झाला आहे. कंपन्यांना उत्पादन घेण्यासाठी सेमीकंडक्टर चिपपासून ते साध्या साध्या गोष्टींचा पुरवठा होत नाहीय. यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. 

मंदीच्या शक्यतेने अनेक कंपन्यांनी नवीन भरती देखील बंद केली आहे. जाहिरातींवरील खर्चही कमी केला आहे. मेटा, अॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या कंपन्यांनी नवीन कर्मचारी भरतीच थांबविली आहे. याचबरोबर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली आहे. मार्क झकरबर्गने तर कर्मचाऱ्यांनी संवाद साधताना वेगवेगळ्या टीमवरील खर्च कमी करत असल्याचे म्हटले आहे. तसेच या टीम आपल्याकडे किती कर्मचारी ठेवावेत ते पाहिल असेही म्हटले आहे. मेटाने जूनमध्येच ३० टक्के नवीन हायरिंग कमी केली होती. गेल्या मंगळवारीच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे प्रमुख नोगोजी ओकोंजो इवेला यांनी देखील जग मंदीकडे जाऊ लागल्याचे म्हटले आगे. अनेक संकटांना तोड दिल्याने ही परिस्थिती उद्भवत आहे, त्यातून सावरण्यासाठी नवीन निती वापरली पाहिजे असे ते म्हणाले. 

क्रंचबेस डेटानुसार अमेरिकेच्या टेक सेक्टरला मोठा फटका बसला आहे. जुलैच्या अखेरपर्यंत या कंपन्यांनी ३२ हजारहून अधिक कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये उबर, नेटफ्लिक्स आणि अनेक क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज प्लॅटफॉर्म आहेत. यामध्ये कर्लनासारख्या कंपन्या देखील आहेत. टेक सेक्टरमध्ये रिकव्हरी खूप कठीण असते. अॅपलने खर्च कमी करण्यासाठी १०० कंत्राटी कामगारांना काढले आहे. 2008 च्या आर्थिक संकटानंतर ही कदाचित पहिलीच वेळ आहे की Google आणि Apple सारख्या तंत्रज्ञान कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी कमी केले आहेत आणि नियुक्ती प्रक्रिया गोठवली आहे.

या वेळी मायक्रोसॉफ्टची जूनमधील कमाई अपेक्षित तिमाही कमाईपेक्षा कमी होती. जुलैमध्ये 1 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आणि ऑगस्टमध्ये ग्राहक केंद्रित R&D प्रकल्पातून 200 कर्मचारी काढून टाकले गेले. यावरून मोठ्या टेक कंपन्या खूप गंभीर समस्यांना तोंड देत आहेत, याचा अंदाज येतो.

टॅग्स :नोकरी