नवी दिल्ली : तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची योजना आखली आहे. प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनांमध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढल्यामुळे व्यवसायातही वाढ झाली आहे. याबाबतची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे.
टीमलीजच्या रोजगार दृष्टीकोन अहवालानुसार, एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत चालू तिमाहीत नवीन नोकर भरती करण्याचा कंपन्यांचा हेतू 7 टक्क्यांवरून 61 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या तिमाहीत, नवीन भरती करण्याचा इरादा 54 टक्के होता. देशभरातील 14 शहरांमध्ये असलेल्या जवळपास 900 लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
अहवालानुसार, मेट्रो आणि टियर-1 शहरांमध्ये त्यात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ते 81 टक्के गुण होते, जे दुसऱ्या तिमाहीत 89 टक्के गुणांवर पोहोचले आहे. याशिवाय, जर आपण द्वितीय श्रेणीतील शहरांबद्दल बोललो, तर येथे नवीन भरती करण्याचा इरादा 7 टक्क्यांवरून 62 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर तिसऱ्या श्रेणीतील शहरांसाठी ही शक्यता तीन टक्क्यांनी वाढून 37 टक्क्यांवर गेली आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातही नवीन नोकरभरती करण्याच्या इराद्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्षेत्रनिहाय दृष्टीकोनातून, दिल्ली उत्पादनात सर्वाधिक 72 टक्के भरती क्षमतेसह आघाडीवर आहे, तर मुंबई (59 टक्के) आणि चेन्नई (55 टक्के) दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सेवांच्या बाबतीत, बंगळुरूच्या सर्वाधिक 97 टक्के कंपन्यांनी जुलै-सप्टेंबर तिमाहीत भरती करण्याचा आपला मानस व्यक्त केला आहे. त्यापाठोपाठ मुंबई (81 टक्के) आणि दिल्ली (68 टक्के) आहे.
काय म्हणाल्या अधिकारी?टीमलीजच्या कार्यकारी संचालिका आणि सह-संस्थापक ऋतुपर्णा चक्रवर्ती यांनी सांगितले की, एकूणच व्यवसायाचे वातावरण सुधारत आहे आणि अधिक कंपन्या आता नवीन नोकर भरती करण्याचा विचार करत आहेत. पीएलआय योजनांमध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढवून, शक्यता सुधारल्या आहेत. नवीन भरती करण्याचा इरादा तर सुधारत आहेच, पण येत्या काही तिमाहीत 70 टक्क्यांचा टप्पा ओलांडण्याचीही शक्यता आहे.