नवी दिल्ली : वाहन उद्योगावर मंदीचे सावट असताना आणि वाहनांच्या विक्रीमध्ये प्रचंड घट होत असताना, त्यावर मार्ग म्हणून अनेक कंपन्यांनी आपल्याकडील वाहने स्वस्तात विकायला सुरुवात केली आहे. वाहनांच्या किमती कमी करण्याबरोबरच, त्यावर अनेक सवलती देण्याने कारचा खप वाढेल, असा त्यांचा अंदाज आहे.
कारवर सध्या २८ टक्के जीएसटी आकारला जात असून, तो कमी करावा, अशी कंपन्यांची मागणी आहे. या प्रचंड जीएसटीमुळे कारच्या किमतीही वाढल्या असून, परिणामी त्यांची मागणी खूपच घटली आहे. ही मागणी कमी कधी होणार, हा प्रश्न आहे, पण तोपर्यंत कारच्या किमती कमी करणे आणि आपल्याकडील वाहने विकणे हाच कंपन्यांपुढे पर्याय आहे.
या कंपन्यांचे म्हणणे आहे की, २८ टक्के जीएसटीमुळे कारची आज जितकी किंमत आहे, त्यावर आम्ही जी सवलत देत आहोत, ती सुमारे तितकीच आहे. म्हणजेच जीएसटी कमी केल्यावर ग्राहकांना ज्या किमतीत कार मिळेल, त्याच किमतीत आम्ही त्या आज विकत आहोत. म्हणजे २८ टक्के जीएसटी असूनही त्यांना कमी दरातच कार खरेदी करणे आताही शक्य आहे. तसे केल्याने कारची विक्री वाढेल आणि आम्हाला कारचे उत्पादन सुरू ठेवता येईल. जवळपास प्रत्येक कंपनीने आपले कार उत्पादन खूपच कमी केले आहे आणि कामगार कपातही केली आहे.
त्याचमुळे आता कारच्या किमती कमी करणे आणि शिवाय काही सवलती देणे हाच उपाय कंपन्यांना दिसत आहे. परिणामी, मारुती सुझुकीने डिझायर कारच्या किमती सुमारे ५0 हजार रुपयांनी कमी केल्या आहेत. याशिवाय मोफत इन्शुरन्स आणि काही सुटे भाग, तसेच मोफत देखभालीच्या काळात वाढ अशा सवलती ही कंपनी देत आहे. म्हणजेच प्रत्यक्ष किमतीपेक्षा ७0 हजार रुपयांचा ग्राहकांना फायदा होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. सेडान (पेट्रोल) कारची एक्स शोरूम किंमत ५ लाख ९0 हजार रुपये असताना, ती ५ लाख ३0 हजार रुपयांना मिळू शकेल. सेडन कारची किंमतही कमी केली आहे. स्विफ्टची किंमत ४३ हजार रुपयांनी कमी केली असून, त्याशिवाय असलेल्या सवलती पाहता, ग्राहकांचा प्रत्यक्षात ६0 हजार रुपयांचा फायदा होईल, असे सांगण्यात येते.
ह्युंदाईनेही याच प्रकारे किमती कमी केल्या आहेत आणि वर सवलतीही देऊ केल्या आहेत. त्यामुळे या कंपनीच्या आय-टेन, तसेच सेडान एक्सेंट व एलांट्रा या कारसाठी किमतीत व सवलती याद्वारे एक ते सव्वा लाख रुपये घट केल्याचा दावा करण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर अनेक डिलर्सनी त्यांचे कमिशनही कमी केले असून, त्याद्वारे आणखी सवलती देण्याचा मार्ग चोखाळला असल्याचे सांगण्यात येते.
...तर या कार भंगारात जातील
सहा महिन्यांनी म्हणजे २0२0 मध्ये बीएस-पाच निकष लागू होतील. आता कंपन्यांकडे असलेल्या कार बीएस-चार निकषात बसणाऱ्या आहेत. म्हणजे ३१ मार्च, २0२0 नंतर आताच्या कार विकणे अशक्य होऊ न बसेल. त्यामुळेच तयार कार सहा महिन्यांच्या आत विकण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत विकल्या न गेलेल्या कार भंगारात काढण्याची वेळ कंपन्यांवर येईल.
कंपन्यांनी कमी केल्या कारच्या किमती; मंदीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न
कारवर सध्या २८ टक्के जीएसटी आकारला जात असून, तो कमी करावा, अशी कंपन्यांची मागणी आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 05:20 AM2019-08-20T05:20:58+5:302019-08-20T05:25:01+5:30