Join us

कंपन्यांचे मूल्य वाढले, एचडीएफसी बँक अग्रस्थानी; सप्ताहाच्या अखेरीस आली तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 10:07 AM

मे महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी ४४,३२६ कोटी  रुपये काढून घेतले आहेत.

- प्रसाद गो. जोशी

सप्ताहाच्या अखेरीस आलेल्या तेजीमुळे बाजाराला आधी झालेली घट भरून काढण्याची संधी मिळाल्याने सलग दुसऱ्या सप्ताहात बाजार वाढला. याला अपवाद ठरला तो स्मॉलकॅप निर्देशांक. या सप्ताहात चलनवाढ, जीडीपी, पीएमआय, अमेरिकेतील बेराेजगारी याबाबतची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्यावरच बव्हंशी बाजाराची दिशा ठरणार आहे.

मे महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी ४४,३२६ कोटी  रुपये काढून घेतले आहेत. देशांतर्गत वित्तसंस्था मात्र पैसे गुंतवित आहेत. या संस्थांनी मे महिन्यामध्ये ४७,४६५ कोटी रुपये गुंतविले आहेत.

एलआयसीला फटका-

सप्ताहाच्या अखेरीस सेन्सेक्समधील पहिल्या दहा कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये वाढ झाली असून, ही एकत्रित वाढ १.१६ लाख कोटी रुपयांची आहे. ज्या कंपन्यांचे मूल्य वाढले त्यामध्ये एचडीएफसी बँक अग्रस्थानी आहे. त्यापाठोपाठ हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, स्टेट बँक आणि कोटक महिंद्र बँक यांचा समावेश आहे.

भांडवलात घट-

बाजारात नोंदणीकृत असलेल्या एकूण कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलमूल्यामध्ये गतसप्ताहात घट झाली आहे. हे मूल्य १,६४,६२७.१२ कोटी रुपयांनी कमी होऊन २,५३,१३,८०८.५२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

टॅग्स :एचडीएफसीशेअर बाजार