मुंबई: देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. मात्र पहिल्या, दुसऱ्या लाटेप्रमाणे या लाटेचा फटका अर्थव्यवस्थेला बसलेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसारखे निर्णय घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अर्थव्यवस्था रुळावर आहे. याचा फायदा नोकरदार वर्गाला होणार आहे. कारण यंदा कंपन्या उत्तम पगारवाढ देण्याच्या तयारीत आहेत.
कॉर्न फेरी या संस्थेनं देशातील औद्योगिक स्थितीचा आढावा घेऊन एक अहवाल तयार केला आहे. यंदा कंपन्या चांगली पगारवाढ देतील असा अंदाज कॉर्न फेरीनं अहवालातून व्यक्त केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपन्यांनी सरासरी ८.४ टक्के इतकी पगारवाढ दिली होती. या वर्षात कंपन्या ९.४ टक्के पगारवाढ देऊ शकतात.
अर्थव्यवस्था आणि ग्राहकांबद्दल कंपन्या आशादायी आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा व्यवसायांना फारसा फटका बसणार नाही, असा विश्वास कंपन्यांना वाटतो. कोरोनाच्या फटक्यातून व्यवसाय बाहेर पडले आहेत. त्यामुळे अर्थकारणाला चालना मिळाली असल्याचं वेदांता समूहाचे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर मधू श्रीवास्तव यांनी सांगितलं.
कॉर्न फेरीच्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला जवळपास ४० टक्के कर्मचारी नव्या संधीच्या शोधात आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे अनेक जण नव्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मेहनती, कार्यक्षम कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडू नये म्हणून कंपन्या यंदा चांगली पगारवाढ देतील, असं कॉर्न फेरीचे चेअरमन नवनीत सिंह यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपन्या यंदा अधिक व्हेरिएबल पे देऊ शकतात. गेल्या वर्षी ६५ टक्के व्हेरिएबल पे देण्यात आला होता. यंदा कंपन्या ७८ टक्के व्हेरिएबल पे देऊ शकतात, असं कॉर्न फेरीचा अहवाल सांगतो.