Baba Ramdev Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी आणि योगगुरू बाबा रामदेव एका कंपनीच्या अधिग्रहणावरुन आमने-सामने आले होते. अखेर बाबा रामदेव यांच्या पतंजलीने बाजी मारली आणि अदानींच्या अदानी विल्मारला माघार घ्यावी लागली. बाबा रामदेव यांनी ही कंपनी त्यांच्या FMCG व्यवसायात विलीन केली आणि आज या कंपनीने दुप्पट नफा मिळवला आहे.
आम्ही ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत, त्या कंपनीचे नाव रुची सोया आहे. ही कंपनी आता पतंजली फूड म्हणून ओळखली जाते. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा दुपटीने वाढू 254.53 कोटींवर पोहचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 112.28 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
महेंद्रसिंग धोनी ब्रँड अँबेसडर असणार
पतंजली फूडने आणखी एक मोठे काम केले आहे. कंपनीने 'कॅप्टन कूल' अर्थात महेंद्रसिंग धोनीला नवीन ब्रँड अँबेसडर बनवले आहे. धोनी पतंजिल फूड्सच्या महाकोश आणि सनरिक सारख्या ब्रँडमध्ये दिसेल.
पतंजली फूडची मोठी कमाई
पतंजली फूडचे एकूण उत्पन्न जुलै-सप्टेंबर तिमाहीत घसरून 7,845.79 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 8,524.67 कोटी रुपये होते. या कालावधीत कंपनीचा एकूण खर्च 7,510.71 कोटी रुपये होता. तर गेल्या वर्षी याच कालावधीत ते 8,371.03 कोटी रुपये होते.