दिग्गज आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टचे (MicroSoft) को-फाउंडर बिल गेट्स यांनी ऑस्ट्रेलियातील एका क्लायमेट टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप फर्ममध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही स्टार्ट-अप फर्म गायीच्या ढेकरातून बाहेर पडणारा मिथेन कमी करण्यावर काम करेल. बिल गेट्स, मांस उत्पादनाच्या एन्व्हायर्मेंटल इम्पॅक्टवर सातत्याने बोलत असतात. कॉर्बन डाय-ऑक्साईडनंतर (CO2) मिथेन हा सर्वात सामान्य हरितगृह गॅस आहे.
कंपनीचे खास सप्लिमेंट मिथेन बनणे रोखणार -
बीबीसीच्या वृत्तानुसार, गाय, बकरी आणि हरीण यांसारखे चार पाय असलेले प्राणी जेव्हा चारा अथवा गवत खातात तेव्हा ते पचवताना त्यांच्या पोटात मिथेन वायू तयार होत असतो. जोनंतर बाहेर काढला जातो. विद्यापीठातील एका अभ्यासत आढळून आले आहे, की जर गायीला समुद्री शैवाल खाण्यास दिले, तर मिथेन गॅसचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर कमी होते. ऑस्ट्रेलियातील पर्थमधील स्टार्ट-अप रुमिन 8 (Rumin 8) आहारातील एका विशिष्ट सप्लिमेन्टवर काम करत आहे. जे मिथेन वायू तयार होण्यापासून रोखते.
इन्व्हेस्टमेन्ट फर्मला बेजोस आणि जॅक मा यांचाही सपोर्ट -
स्टार्ट-अप Rumin 8 ने आपण ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्सच्या नेतृत्वाखालील फंडिंग राउंडमध्ये 12 मिलियन डॉलर एकत्रीत केले असल्याचे जाहीर केले आहे. बिल गेट्स यांनी 2015 मध्ये ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्सची सुरुवात केली होती. इन्व्हेस्टमेंट फर्मला अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस आणि अलीबाबाचे को-फाउंडर जॅक मा यांचाही सपोर्ट आहे. रुमिन 8 चे मॅनेजिंग डायरेक्टर डेव्हिड मेस्सिना यांनी म्हटले आहे, 'जगभरातील क्लायमेट इम्पॅक्ट फंड्सकडून मिळालेल्या रिस्पॉन्समुळे आम्ही आनंदी आहोत.'