दूरसंचार नियामक प्राधिकर ट्राय (TRAI) वेळोवेळी आपले नियम बदलत असतं. खरं तर मोबाईलचा अनुभव लोकांसाठी चांगला व्हावा यासाठी ट्रायकडून नवनवीन निर्णय घेतले जातात. अनेकदा मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर्सना यात त्रास होतो, पण काही वेळा यामुळे कंपन्यांना दिलासाही मिळतो. आज आम्ही तुम्हाला जो निर्णय सांगणार आहोत, त्यामुळे मोबाइल युजर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या निर्णयामुळे युजर्सना नुकसान भरपाई मिळण्यापासून सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे.
खरं तर अनेकदा असं दिसून येतं की, मोबाईल युजर्सना अनेक समस्या येतात. विशेषत: पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी हे दिसून येतं. तसंच अनेकवेळा तक्रार करूनही ते सोडवलं जात नाही, त्यामुळेच ट्रायनं आता याबाबत डेडलाईन निश्चित केली आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.
आता मिळणार नुकसान भरपाई
ट्रायचे म्हणणं आहे की, जर टेलिकॉम कंपनीनं क्वालिटी स्टँडर्डचं पालन केलं नाही तर त्यांना मोठा दंड भरावा लागेल. पूर्वी दंडाची रक्कम ५० हजार रुपये होती, ती आता वाढवून १ लाख रुपये करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हा निर्णय टेलिकॉम ऑपरेटर्ससाठी डोकेदुखी ठरू शकतो.
ट्रायनं आपल्या जुन्या नियमांमध्ये काही बदल केलं असून दंडाची रक्कमही वेगवेगळ्या स्वरूपात विभागण्यात आली आहे. ब्रॉडबँड आणि वायरलाइन, वायरलेस सर्व्हिसेस रेग्युलेशन, २०२४ चे उल्लंघन केल्यास ही रक्कम भरावी लागणार आहे. दंडाची रक्कम एक लाख, दोन लाख, पाच लाख आणि दहा लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच आता दंडही वेगळ्या पद्धतीने निश्चित करण्यात आला आहे.
मोफत सवलत द्यावी लागेल
ट्रायच्या नव्या नियमांनुसार एखाद्या जिल्ह्यात नेटवर्क बंद झालं तरी टेलिकॉम कंपन्यांना त्रास होणार आहे. हा फायदा प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना मिळणार आहे. आता त्यांना कनेक्शनची वैधता वाढवून मिळणार असून त्यासाठी त्यांना काहीही करावं लागणार नाही. परंतु या बंदसाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच एखादं नेटवर्क २४ तास ठप्प राहिल्यास टेलिकॉम कंपन्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, जी त्यांना कोणत्याही स्वरूपात भारी पडणार आहे.
१२ तासांचा एक दिवस
ट्रायच्या या नियमामुळे ग्राहकांना फायदा होऊ शकतो आणि टेलिकॉम कंपन्यांचं नुकसान होऊ शकतं. कारण समजा एखादं नेटवर्क सलग १२ तास बंद पडलं तर ते १ दिवस म्हणून गणले जाईल. उदाहरणार्थ, जर नेटवर्क सलग १२ तास ठप्प असेल तर कंपन्या ग्राहकांना १ दिवस अधिक वैधता देतील.
ब्रॉडबँडसाठीही नियम
विशेष म्हणजे हा नियम केवळ मोबाइल कंपन्यांनाच नाही तर ब्रॉडबँड प्रोव्हायडर्सनाही लागू होणार आहे. सलग ३ दिवस ब्रॉडबँड सेवा बंद राहिल्यास त्याऐवजी कंपन्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल, असं त्यात म्हटलं आहे. म्हणजे त्यांना नेटवर्क दुरुस्त करण्याचं काम तातडीने सुरू करावं लागेल आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास उलट परिणाम होऊ शकतो. अशा तऱ्हेनं हे नियम अत्यंत कडक असणार आहेत, असं म्हणता येईल. ट्रायचे हे नवे नियम येत्या ६ महिन्यांमध्ये लागू होतील.