Join us

दूरसंचार क्षेत्रात आता गुणवत्तेसाठी स्पर्धा!, दर कमी करणे अशक्य; नव्या योजना आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 1:35 AM

दूरसंचार क्षेत्रातील दर आता इतके कमी झाले आहेत की, त्यात आणखी कपात शक्य नाही; त्यामुळे दरयुद्ध आता मागे पडले असून, यापुढची स्पर्धा सेवेची गुणवत्ता आणि लक्ष्य निर्धारित नव्या योजना या आधारे लढली जाणार आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील दर आता इतके कमी झाले आहेत की, त्यात आणखी कपात शक्य नाही; त्यामुळे दरयुद्ध आता मागे पडले असून, यापुढची स्पर्धा सेवेची गुणवत्ता आणि लक्ष्य निर्धारित नव्या योजना या आधारे लढली जाणार आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.काउंटरपाइंट रिसर्च या संस्थेचे संशोधन विश्लेषक सत्यजीत सिन्हा यांनी सांगितले की, भारतीय दूरसंचार क्षेत्र आता ‘क्यूओएस’च्या (क्वालिटी आॅफ सर्व्हिस) दिशेने वाटचाल करीत आहे. ग्राहक टिकविणे आणि नवीन ग्राहक मिळविणे यासाठी सेवेची गुणवत्ताच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याशिवाय सेवा देणा-या कंपन्या आता इंटरनेट आॅफ थिंग्जसारख्या नव्या तंत्रज्ञानावर लक्ष्य केंद्रित करतील, अशी अपेक्षा आहे. नव्या सेवा आणल्या जातील. ग्राहक विभाग आणि व्यावसायिक विभाग यानुसार या सेवा बदलतील. दूरसंचार क्षेत्रातील आधीच्या कंपन्या भारती एअरटेल, व्होडाफोन इंडिया व इंडिया सेल्युलर तसेच रिलायन्स जिओ इन्फोकॉम यांच्याकडून गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. विश्लेषक संस्था ‘ईवाय’ने दिलेल्या माहितीनुसार, बड्या कंपन्यांत यापुढे दरयुद्ध होण्याची शक्यता नाही. छोट्या कंपन्या मात्र ग्राहक टिकविण्यासाठी दर कमी करतील. त्यामुळे यापुढे दरयुद्ध छोट्या कंपन्यांपुरतेच मर्यादित राहील.>प्रोजेक्ट नेक्स्टदूरसंचार क्षेत्रातील या नव्या युगाची सुरुवात भारती एअरटेलच्या ‘प्रोजेक्ट नेक्स्ट’ या प्रकल्पाने केली आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा प्रकल्प ग्राहकांशी संवाद साधण्यावर भर देत आहे. कंपनीने देशभरात नव्या पिढीसाठी खास एअरटेल स्टोअर्स सुरू केली आहेत. एअरटेलच्या प्रवक्त्याने सांगितले की, ग्राहकांकडून मिळालेल्या सूचनांनुसार काही बदल कंपनीने केले आहेत. उदा. पोस्ट-पेड ग्राहक आपला न वापरलेला मासिक डाटा पुढील बिलिंग सायकलमध्ये घेऊन जाऊ शकतात.