Join us

ओनिडा उत्पादनांच्या विरोधात तक्रारी

By admin | Published: November 07, 2015 2:54 AM

ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या निर्मितीत देशात गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत असलेल्या ओनिडा कंपनीच्या वाढत्या तक्रारींमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले असून, या तक्रारींची

मुंबई : ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या निर्मितीत देशात गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत असलेल्या ओनिडा कंपनीच्या वाढत्या तक्रारींमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले असून, या तक्रारींची सोडवणूक न करण्याच्या कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे ग्राहकांची पुरती कोंडी झाली आहे.टीव्ही, एलईडी, एलसीडी, वॉशिंग मशिन, एअर कंडशनिंग मशीन अशा सर्वच प्रमुख उत्पादनांबाबत ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, काही ग्राहकांना नव्याने खरेदी केलेल्या उत्पादनांच्या सेवेबाबतही त्रास झाल्याचे समजते. कंपनी आपले उत्पादन देताना वारेमाप आश्वासने देते पण विक्रीनंतर अपेक्षित असलेल्या ग्राहक सेवेबाबत मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा अनुभव ग्राहकांनी व्यक्त केला आहे. ग्राहकांच्या प्रातिनिधीक तक्रारी पुढीलप्रमाणे - विरार पश्चिमेला राहणाऱ्या डिसोझा या एका ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा ओनिडा कंपनीचा टीव्ही बंद पडला. याची तक्रार केल्यावर व त्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कंपनीचा प्रतिनिधी त्यांच्याकडे आला. टीव्हीची प्राथमिक तपासणी केल्यावर त्यातील एक पार्ट काढून दुरुस्तीसाठी घेऊन गेला. दोन ते तीन दिवसांत दुरुस्ती करून तो पुन्हा बसविणे अपेक्षित होते. मात्र , तो पाच दिवसांनी फिरकला व त्या दुरुस्तीपोटी दीड हजार रुपयांचे शुल्क आकारले. परंतु, त्याची कोणतीही पावती दिली नाही. पावती मागितली असता मेसेज येईल असे सांगितले. यानंतरही सातत्याने पाठपुरावा केल्यावर काही दिवसांनी मेसेज आला. आता परत टीव्ही बंद पडला असून त्याची वारंवार तक्रार करूनही कंपनीने तपासणीकरिता प्रतिनिधी पाठवला नाही. आपण ओनिडाचा टीव्हीच काय पण कोणतेही उत्पादन का खरेदी करावे असा त्रस्त सवाल डिसोझा यांनी केला आहे.कंपनीचे आणखी एक ग्राहक प्रेम आनंद सिंग यांनीही असाच अनुभव आला. त्यांनी ५० इंचाचे टीव्हीचे जिनियस हे मॉडेल खरेदी केले. ते मॉडेल इन्स्टॉल करण्यासाठी कंपनीचा टेक्निशीयन घरी आला. पण ते मॉडेल सदोष असल्याने ते बसविता आले नाही. सिंग यांनी वारंवार टीव्ही संच बदलून मागितला. परंतु, त्यांनाही कंपनीकडून समाधानकारक अनुभव आला नाही.ओनिडा कंपनीचा एसी खरेदी केलेल्या सतपाल सिंग यांना तर एसी सर्व्हिंसिंगबाबत फारच क्लेशदायी अनुभव आला. एसीमशीनच्या सर्व्हिर्सिंगसाठी सातत्याने कंपनीला संपर्क केला. परंतु, उद्या इंजिनियर येईल असे सांगत तब्बल १० दिवसांनी सर्व्हिर्सिंगसाठी इंजिनियर आला. कंपनीने ग्राहकांच्या तक्रारी गांभीर्याने घ्याव्यात असे सतपाल सिंग यांचे म्हणणे आहे.कंपनीचे वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्या मुरलीधर राव यांचीही व्यथा तीच आहे. त्यांनी मुलाच्या नावे वॉशिंग मशीनची खरेदी केली आहे. मशीन खरेदी करतानाच त्याची दोन वर्षांची वाढीव वॉरन्टीही घेतली. काही दिवसांतच मशीनचे वरचे कव्हर मशीन सुरू असताना अडकून तुटले. याबद्दल कंपनीकडे तक्रार केली असता एका आॅफिसमधून दुसऱ्या आॅफिसमध्ये असे दोन महिने घुमविल्याचा अनुभव त्यांना आला.एकिकडे कंपन्या अधिकाधिक ग्राहकाभिमुख होत असताना ओनिडा कंपनीकडून येणाऱ्या विपरित अनुभवामुळे आता अनेक ग्राहक कोर्टातही जाण्याच्या विचारात आहेत.