PAN-Aadhaar Link: जर तुम्ही तुमचे आधार कार्डपॅन कार्डशी लिंक केले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. इन्कम टॅक्स विभागाने करदात्यांना ३१ मेपर्यंत पॅन आणि आधार लिंक (PAN-Aadhaar Link) करण्याचा सल्ला दिलाय. इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार जर पॅन कार्ड बायोमेट्रिक आधारशी लिंक नसेल तर लागू दरापेक्षा दुप्पट दराने टीडीएस कापाला जाईल.
इन्कम टॅक्स विभागानं गेल्या महिन्यात एक परिपत्रक जारी करून करदात्यांनी ३१ मे पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केल्यास कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. 'अधिक दरानं कर कपात टाळण्यासाठी ३१ मे २०२४ पूर्वी तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करा,' असं विभागानं मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर शेअर केलंय.
आयकर विभागाने एका वेगळ्या पोस्टमध्ये बँका, फॉरेक्स डीलर्ससह रिपोर्टिंग संस्थांना दंड टाळण्यासाठी ३१ मेपर्यंत एसएफटी दाखल करण्यास सांगितलं आहे. एसएफटी (स्टेटमेंट ऑफ स्पेसिफाइड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स) दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे. योग्य रितीने आणि वेळेवर अर्ज करून दंड टाळण्याचंही आवाहन त्यांनी केलंय.
एक हजार रुपयांपर्यंत दंड
अहवाल देणाऱ्या संस्था, परकीय चलन विक्रेते, बँका, उप-रजिस्ट्रार, एनबीएफसी, पोस्ट ऑफिस, बॉन्ड/कर्जरोखे जारी करणारे, म्युच्युअल फंड ट्रस्टी, डिविडेंड देणाऱ्या किंवा शेअर्सची खरेदी करणाऱ्या कंपन्यांना कर अधिकाऱ्यांकडे एसएफटी रिटर्न दाखल करणं आवश्यक आहे. एसएफटी रिटर्न भरण्यास उशीर केल्यास प्रत्येक 'डिफॉल्ट' दिवसासाठी एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. एसएफटी न भरणं किंवा चुकीचे स्टेटमेंट दाखल केल्यास दंड होऊ शकतो. एसएफटीच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीनं केलेल्या मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर इन्कम टॅक्स विभाग लक्ष ठेवतो.