Join us

Financial Deadline : २ दिवसांत पूर्ण करा ही ५ कामं, अन्यथा होईल नुकसान; ३० सप्टेंबर आहे अखेरची तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 12:07 PM

३० सप्टेंबरपर्यंत काही महत्त्वाची कामं पूर्ण करणं आवश्यक आहे. असं न केल्यास तुमचं मोठे नुकसान होऊ शकतं.

Financial Deadline: सप्टेंबर महिना संपत आला आहे. नवा ऑक्टोबर महिना सुरू होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत काही महत्त्वाची कामं पूर्ण करणं आवश्यक आहे. असं न केल्यास तुमचं मोठे नुकसान होऊ शकतं. यामध्ये २००० रुपयांची नोट बदलणं, छोट्या योजनांच्या खात्यांमध्ये आधार कार्ड अपडेट करणे यासह ५ कामांचा समावेश आहे. केवळ दोनच दिवसांचा कालावधी उरल्यानं आपण शक्य तितक्या लवकर या गोष्टी या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत. ३० सप्टेंबरपूर्वी कोणती कामं आपल्याला पूर्ण करावी लागणार आहे ते पाहू. ही कामं तुम्ही पूर्ण न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान सोसावं लागू शकतं.

SBI व्ही-केअर स्कीमस्टेट बँक ऑफ इंडिया आपली विशेष फिक्स्ड डिपॉझिट स्कीम व्हीकेअर (WeCare) योजना बंद करणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ३० सप्टेंबरपूर्वी गुंतवणूक करावी लागेल. ही एसबीआयची विशेष एफडी योजना आहे जी अधिक व्याजदरासह येते. म्हणूनच, जर तुम्हाला जास्त व्याजदरानं एफडी करायची असेल तर ३० तारखेपूर्वी त्यात गुंतवणूक करावी लागणार आहे.

२ हजारांची नोटतुमच्याकडेही दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर त्या लगेच बदलून घ्या. ते बदलण्यासाठी तुमच्याकडे फक्त ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वेळ आहे. जर तुम्ही ते बदलले नाहीत तर त्या रद्दीप्रमाणे होती. १९ मे २०२३ रोजी सरकारनं २००० रुपयांची नोट चलनातून काढण्याचा निर्णय घेतला होता. सध्या बाजारात असलेल्या या नोटा बँकेमार्फत परत करण्यासाठी ३० सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

आधार कार्ड अपडेटअल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी, त्यांच्या खात्यातून आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख देखील ३० सप्टेंबर आहे. तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा सुकन्या समृद्धी योजना इत्यादीसारख्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या खात्यात ३० सप्टेंबरपूर्वी आधार अपडेट करणे आवश्यक आहे.

बँक लॉकर अॅग्रीमेंटएसबीआय आणि बँक ऑफ बडोदासह इतर बँकांमध्ये लॉकर घेणार्‍या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँक लॉकर घेणाऱ्या ग्राहकांना नवीन करारावर स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. तुमचं देखील या बँकांमध्ये लॉकर असल्यास, तुम्ही ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करणं आवश्यक आहे.

बंद होतेय ही स्कीमभारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी आपली सिंगल प्रीमियम योजना म्हणजेच धन वृद्धी योजना बंद करणार आहे. ही योजना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बंद केली जाईल. जर तुम्हाला या लाइफ टाईम पॉलिसीमध्ये खात्रीशीर परताव्यासह गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही ही पॉलिसी ३० तारखेपूर्वी ती करू शकता. या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ आयुष्यभर मिळेल.

टॅग्स :आधार कार्डपीपीएफगुंतवणूक