Join us

पुढील २४ तासांत ‘ही’ कामं आटोपून घ्या; दुर्लक्ष केल्यास बसेल आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 9:16 PM

३१ मार्च ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर तुम्हाला आयटीआर दाखल करण्याची संधी मिळणार नाही.

मुंबई – आर्थिक वर्ष २०२१-२२ संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे गुरुवारी ३१ मार्च रोजी ही कामं करा अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यात बँकिंग सेक्टरपासून ते गुंतवणुकीपर्यंत सर्वकाही समावेश आहे. जर तुम्ही नोकरदार असाल तर तुम्हाला ७ लाखांचा बंपर फायदा घेण्याची ही संधी आहे. EPFO कडून नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला विविध सुविधा दिल्या जातात. त्यात EPFO कडून तुम्हाला ७ लाखांचा फायदा आहे. जर तुम्ही EPFO सब्सक्राइबर्स असाल तर ३१ मार्चला नॉमिनीचं नाव लवकर भरून द्या.

जर तुम्ही ITR रिटर्न फाइल केला नसेल तर लवकर करा. ३१ मार्च ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर तुम्हाला आयटीआर दाखल करण्याची संधी मिळणार नाही. जर कुणी आयटीआर रिटर्न फाइल केला नाही तर त्याला १० हजारांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. जर तुम्हाला दीर्घ मुदतीचा भांडवली नफाही मिळाला असेल, तर रु. १ लाखांपर्यंतच्या नफ्यावर कर सवलतीचा लाभ घेण्याची ही शेवटची संधी आहे. ३१ मार्चपूर्वी, तुम्ही अशा प्रकारे नफ्यावर प्रॉफिट बुक करा की तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळू शकेल. खरं तर, स्टॉक आणि इक्विटी ओरिएंटेड फंडांवर १ लाख रुपयांपेक्षा जास्त दीर्घकालीन भांडवली नफ्यावर आता कर आकारला जातो.

जाणून घ्या काय आहेत कामं?

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PMAY) सरकार लोकांना स्वस्त दरात सुविधा पुरवते. यामध्ये, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना, सरकार जास्तीत जास्त २.६७ लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजावर सबसिडी देते. यामध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटांना वेगवेगळी सबसिडी दिली जाते. या योजनेचा लाभ ३१ मार्चपर्यंत मिळणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये टाईम डिपॉझिट, सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम किंवा मंथली स्कीम यासारख्या छोट्या बचत योजनेत असाल, तर नक्कीच ही खाती ३१ मार्चपर्यंत बँकेच्या बचत खात्याशी किंवा पोस्ट ऑफिस बचत खात्याशी लिंक करा. वास्तविक, १ एप्रिलपासून या योजनांचे पैसे बचत खात्यातच उपलब्ध होतील. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही रोखीने व्याजाचे पैसे घेऊ शकणार नाही.

जर तुम्ही शेअर बाजारातही गुंतवणूक करत असाल तर हे जाणून घ्या की, डीमॅट आणि बँक खातेधारकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत KYC अपडेट करणे अनिवार्य आहे. बँक तुम्हाला KYC अंतर्गत पॅन कार्ड, पत्ता जसे की आधार, पासपोर्ट इत्यादी अपडेट करण्यास सांगते. तुमचे KYC अपडेट न केल्यास तुमचे बँक खाते बंद केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे, तुमचे डीमॅट खाते केवायसीशिवाय बंद केले जाऊ शकते.

तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) पैकी कोणतेही गुंतवणुकदार असाल, तर या आर्थिक वर्षांमध्ये किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे पीपीएफ आणि एनपीएसमध्ये पैसे जमा न केल्यास, ही खाती निष्क्रिय होतील आणि ती पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.

जर तुम्ही आयकर सवलतीचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल,तर हे जाणून घ्या, तुम्हाला ३१ मार्चपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. वास्तविक, आयकर कायद्याच्या 80C आणि 80D सारख्या अनेक कलमांतर्गत केलेल्या गुंतवणुकीवरच कर सवलतीचा लाभ मिळतो. आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते.

कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्चपर्यंत तुमचा पॅन आणि आधार लिंक करा. आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही भारतातील सर्वात महत्त्वाची कागदपत्रे आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यापासून ते कोणत्याही मोठ्या बँकिंग व्यवहारापर्यंत, आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करणे देखील आवश्यक आहे. ३१ मार्चपूर्वी तुम्ही ते लिंक केले नाही तर तुमचे आधार निष्क्रिय होईल आणि पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर मोठा दंड भरावा लागू शकतो.

टॅग्स :व्यवसाय