कम्प्युटर कंपनी Aptech चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ अनिल पंत यांचं निधन झालं. १५ ऑगस्ट रोजी पंत यांनी अखेरचा श्वास घेतला. कंपनीनं स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे. अॅप्टेक टीमला पंत यांचं योगदान आणि सपोर्टिव्ह एनर्जीचं कमतरता भासेल, असंही कंपनीनं नमूद केलंय.
जून महिन्यात प्रकृतीच्या कारणास्तव अनिल पंत हे रजेवर गेले होते, असं कंपनीनं सांगितलं होतं. यानंतर १९ जून रोजी कंपनीची एक तातडीची बैठकही झाली होती. तसंच कंपनीनं कामकाज सुरळीत व्हावं आणि कामकाजाची सातत्य सुनिश्चित करण्यासाठी मंडळाचे निवडक सदस्य आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांचा समावेश असलेली अंतरिम समिती स्थापन केली. अॅप्टेक कंपनीमध्ये झुनझुनवाला यांचीही गुंतवणूक आहे.
अनिल पंत यांच्याविषयी
२०१६ पासून अनिल पंत अॅप्टेकचे एमडी आणि सीईओ होते. अॅप्टेकचं कामकाज सांभाळण्यापूर्वी त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि सिफी टेक्नॉलॉजीसारख्या कंपन्यांमध्येही सेवा बजावली आहे. याशिवाय त्यांनी ब्लो पास्ट, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्स, विप्रो आणि टॅली सारख्या कंपन्यांमध्येही काम केलंय. त्यांनी बी.एम.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मलेशियाच्या लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पीएचडी केली होती.