मनोज गडनीस,
मुंबई- स्मार्टफोनच्या आकारात झालेली वाढ आणि किमतीत झालेली घट याचा फटका थेट डेस्कटॉप संगणकाच्या विक्रीला बसला असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात डेस्कटॉपच्या विक्रीत तब्बल २० टक्क्यांची घट नोंदली गेली आहे. वार्षिक पातळीवर ही घट ७.८ टक्के इतकी आहे. गेल्या दशकातील ही सर्वाधिक घट आहे. उपलब्ध माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात १९ लाख ९० हजार डेस्कटॉप संगणकांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात २० टक्के घट आहे. ही आकडेवारी ही घरगुती वापरासाठी खरेदी झालेल्या संगणकांची आहे. व्यावसायिक वापरासाठी घेतलेल्या संगणकांच्या विक्रीतही गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत तब्बल १६ टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. या विक्रीचा आकडा हा नऊ लाखांच्या घरात आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीच्या तुलनेत व्यावसायिक वापराच्या संगणकाच्या विक्रीतील घट ही २४.५ टक्के इतकी आहे. या कालावधीत संगणकाच्या किंवा कोणत्याही ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या विक्रीच्या आकड्याला विशेष महत्त्व आहे. याचे कारण म्हणजे, नवे आर्थिक वर्ष सुरू होताना अनेक लहान-मोठ्या कंपन्यांतून संगणक, अथवा अन्य खरेदीचा जोर असतो. कारण एप्रिल किंवा या पहिल्या तिमाहीत घेतलेल्या वस्तूचा पुरेपूर उपभोग आणि घसारा घेणे सुलभ होते. त्यामुळेच संगणकाच्या विक्रीत झालेली घट ही महत्त्वाची आहे. संगणकाच्या विक्रीत सातत्याने होणारी घट याचे विश्लेषण करताना या बाजाराचे अभ्यासक मुकेश शास्त्री म्हणाले की, स्मार्टफोनमुळे केवळ डेस्कटॉपच नव्हे, तर लॅपटॉप आदी संगणकाच्या बाकीच्या मॉडेलचीही अवस्था कठीण होताना दिसत आहे. स्मार्टफोन आणि काही कंपन्यांनी सादर केलेले फॅब्लेट यामुळे लोकांना फोन आणि संगणकातील सर्वांत महत्त्वाच्या सुविधा एकाच उपकरणात उपलब्ध झाल्यामुळे स्वाभाविकच लोक त्याला पसंती देताना दिसत आहेत आणि त्याचा फटका संगणकाच्या विक्रीला बसत आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून संगणकाची आॅपरेटिंग सिस्टिम आणि दैनंदिन उपयोगाच्या सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात अग्रेसर असलेल्या कंपन्यांनी पायरसीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी केली आहे. याअंतर्गत, या कंपन्यांनी मुख्य म्हणजे, प्रत्येक सॉफ्टवेअरचे नवे व्हर्जन हे आॅनलाइन उपलब्ध केले आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीकडे लायसन्स कॉपी नसेल, तर त्याचा शोध घेणे या कंपन्यांना सोपे जाते. या कंपन्यांनी असे लाखो ग्राहक शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)>स्मार्टफोन विक्रीची कोटीच्या कोटी उड्डाणे३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात देशामधील स्मार्टफोनच्या विक्रीत 33%वाढ नोंदली गेली. देशात मोबाइलमध्ये स्मार्टफोनची हिस्सेदारी आता ७६ टक्क्यांवर पोहोचली आहे. देशातील प्रथम श्रेणीच्या अशा ५० शहरांतून स्मार्टफोनच्या विक्रीची टक्केवारी 60%आहे. तर नागरी व ग्रामीण भागातील वाढती आकडेवारीही मोठी आहे. गेल्या तीन वर्षांपासून भारतात स्मार्टफोनच्या विक्रीत सरासरी 25%वाढ नोंदली गेली आहे. हा वेग असाच कामय राहण्याचा अंदाज या क्षेत्रातील विश्लेषण संस्थांनी व्यक्त केला आहे.>या तुलनेत जर स्मार्टफोनचा विचार केला तर यावरील आॅपरेटिंग सिस्टिम ही मोफत आहे. ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक जिथे, संगणकाचा वापर हा वर्ड, एक्सेल व पॉवरपॉइंट यासाठी करतात, ती सर्व सुविधा मोबाइल कंपन्यांनी स्मार्टफोनवर उपलब्ध करून दिली आहे. या सुविधा व फोनमधील इंटरनेट यांची जोडणीही अत्यंत सुलभतेने केल्यामुळे लोक डेस्कटॉपऐवजी स्मार्टफोनला पसंती देताना दिसत आहेत.