- प्रतीक कानिटकर
ब्रॅण्ड म्हणजे असे एक चिन्ह, शब्द किंवा त्यामधील एक संयोजन, जे त्या वस्तू अथवा सेवेची ग्राहकाच्या मनात प्रतिमा निर्माण करण्याचे, त्या वस्तू अथवा सेवेला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपासून वेगळे स्थापित करण्याचे आणि निष्ठावान ग्राहक तयार करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. जे कालांतराने व्यवसाय विक्रीची उद्दिष्टे आणि नफ्यातील उच्च स्तर गाठण्यास व्यावसायिकाला उपयोगी ठरते.
बरेचदा व्यावसायिक ब्रॅण्ड निर्मितीबद्दल जरी जागरूक असले तरीही त्या ब्रॅण्डच्या कायदेशीर संरक्षणाबद्दल म्हणजेच ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनबाबत अनभिज्ञ असतात. अशा वेळी ‘गूळ असल्याशिवाय मुंग्या येत नाहीत’ या मराठी म्हणीची चांगलीच प्रचिती व्यावसायिकाला येते. म्हणजेच जोवर आपला लोगो हा ब्रॅण्ड म्हणून ओळखला जात नाही तोवर त्याचे अनुकरण कोणीही करत नाही, पण हेच एकदा व्यवसायाचा ब्रॅण्ड प्रस्थापित झाला की त्याचे अनुकरण व्यावसायिकाच्या प्रतिस्पर्ध्यांकडून केले जाते, ज्यामुळे व्यवसायाच्या विक्रीवर दूरगामी वाईट परिणाम होऊ शकतो.
या लेखांतर्गत (भाग १) आपण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन म्हणजेच ब्रॅण्डचे नोंदणीकरण करण्याबाबतच्या मूलभूत संकल्पना समजून घेऊ:-
ट्रेडमार्क कायद्यानुसार, ट्रेडमार्क म्हणजे ग्राफिकदृष्ट्या प्रतिनिधित्व केले जाणारे एक चिन्ह. जे एखाद्या वस्तू अथवा सेवेचे इतर वस्तू अथवा सेवांपासून वर्गीकरण करण्यास सक्षम आहे आणि ज्यामध्ये वस्तूंचा आकार, त्यांचे पॅकेजिंग आणि रंगांचे संयोजन यांचादेखील समावेश केला जाऊ शकतो.
थोडक्यात, या व्याख्येवरून हे दिसून येते की कायद्याअंतर्गत ट्रेडमार्कची व्याख्या खुली आहे. ज्यामध्ये असे कोणतेही चिन्ह, जे त्या वस्तू किंवा सेवेला दुसऱ्या वस्तू किंवा सेवेपासून वेगळे दर्शवण्यास सक्षम असल्यास, शब्द, डिव्हाइस, ब्रॅण्ड, शीर्षलेख, अक्षरे इ. हे ट्रेडमार्क म्हणून नोंदणीकृत केले जाऊ शकतात.
ट्रेडमार्क हे मनुष्याच्या नावाप्रमाणेच असते. जसे पृथ्वीवर जन्मानंतर प्रत्येक मनुष्याचे वेगळे नाव त्याची वैयक्तिक ओळख स्थापित करण्यासाठी ठेवले जाते. त्याचप्रमाणे व्यवसायात वस्तू अथवा सेवेचे नाव ठेवले जाते ज्याचा कालांतराने ब्रॅण्ड म्हणून वापर केला जातो. आणि म्हणूनच या वस्तू अथवा सेवेच्या नावाचे नोंदणीकरण करणे अनिवार्य ठरते. ट्रेडमार्क हे एक प्रतीक आहे ज्याचा वापर कंपनी आपल्या उत्पादनांवर (लोगोवर) करते आणि ज्याद्वारे दुसºया कंपन्यांना त्या लोगोच्या वापरास कायदेशीरपणे मज्जाव करू शकते.
ट्रेडमार्क कायद्यांतर्गत ‘चिन्ह’ म्हणजेच कोणतेही डिव्हाइस, ब्रॅण्ड, शीर्षक, लेबल, तिकीट, नाव, स्वाक्षरी, शब्द, अक्षर, प्रतीक, संख्या, अंकीय घटक, विविध रंगांचे समायोजन तसेच या सगळ्या तत्त्वांचे समायोजन याचे नोंदणीकरण करून सुरक्षित करता येते.
ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन या विषयाकडे वळण्याआधी ‘ब्रॅण्ड’ या संकल्पनेबद्दल थोडक्यात जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
ट्रेडमार्क कायद्यांतर्गत असा कोणताही ब्रँड / लोगो अथवा चिन्ह नोंदणीकृत करता येत नाही. त्याच्या अर्जामध्ये पुढील मुद्दे आढळतात:-
- ज्या चिन्हांमध्ये कोणतीही गोष्ट निंदनीय किंवा अश्लील असल्यास.
- चिन्ह लागू असलेल्या कोणत्याही कायद्याच्या विरोधात असल्यास.
- ज्या चिन्हाला पाहून पाहणाºयांची फसवणूक किंवा गोंधळ होऊ शकतो (समान दिसणारे लोगो).
- ज्या चिन्हाच्या वापराने कोणत्याही नागरिकाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात.
- जे चिन्ह कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कार्यालय किंवा संस्थांच्या प्रारंभिक चिन्ह, हॉलमार्क, मोनोग्राम, नकाशा, ध्वज, प्रतीक किंवा त्या चिन्हाचे भाग, अथवा नावाशी समान किंवा अंशत: समान आहेत.
- जे चिन्ह कायद्याच्या संरक्षणासाठी प्रतिबंधित केले गेले आहे.
- जे चिन्ह नोंदणीकृत करण्याचा अर्ज हा अप्रामाणिकपणे केला गेला आहे.
याउलट पुढील बाबी लोगोमध्ये असल्याने ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुकर होते -
- लोगोमधील शब्दाचा अथवा चिन्हाचा उच्चार करणे आणि ते लक्षात ठेवणे सोपे असावे.
- त्या लोगोचे योग्यरीत्या शब्दलेखन करणे सुकर असावे.
- ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेत निषिद्ध गुणांच्या वर्गाशी लोगो संलग्न नसावा.
- लोगो ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनच्या नोंदणीची आवश्यकता पूर्ण करणारा असावा.
- भौगोलिक नाव, सामान्य वैयक्तिक नाव निवडण्याचे टाळावे.
- व्यावसायिकाने लोगोची निवड करताना वरील मुद्दे लक्षात ठेवणे हे इष्ट ठरते. जेणेकरून ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेत कोणतीही बाधा येणार नाही.
- यापुढील लेखांत ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचे फायदे तसेच प्रक्रियेबद्दल आपण अधिक जाणून घेऊ.