मुंबई : देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे, १४,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पुढील तीन ते चार वर्षांत सुमारे ४८ हजार अतिरिक्त इलेक्ट्रिक वाहन चार्जर बसवले जातील, असे एका अहवालात म्हटले आहे. रेटिंग एजन्सी इक्राने अहवालात म्हटले आहे की, दुचाकी, तीन-चाकी आणि बस विभागामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असल्याने चार्जिंग सुविधा यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
अहवालानुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात दुचाकी श्रेणीतील नवीन इलेक्ट्रिक वाहनांची विक्री १३ ते १५ टक्के असेल, ३० टक्क्यांहून अधिक तीनचाकी वाहने असतील तर ८ ते १० टक्के बस इलेक्ट्रिक असतील, असे अहवालात म्हटले आहे.
सध्या देशात २ हजारपेक्षाही कमी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आहेत आणि त्यापैकी बहुतेक निवडक राज्यांमध्ये आणि मुख्यतः शहरी भागात आहेत. ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारत अजूनही मागे आहे. तथापि, इतर देशांप्रमाणे, भारतात ईव्ही चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविण्यासाठी जोरदार धोरणात्मक प्रयत्न सुरू आहेत. अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांनी चार्जिंग इन्फ्रा स्ट्रक्चरमध्ये उतरण्याची घोषणा केली आहे.