मुंबई : कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या घबराटीच्या पार्श्वभूमीवर बाजारातील आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी योग्य कृती केली जाईल, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे गुंतवणूकदार उगवत्या अर्थव्यवस्थांमधून बाहेर पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा मोठा फटका भारताला बसू शकतो. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी केले आहे. जगातील सर्वच देशांच्या केंद्रीय बँका कोरोनाविरोधात एकत्रित पावले उचलण्याची तयारी करीत आहेत. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात ५० आधार अंकांची कपात केली आहे. त्याआधी रिझर्व्ह बँक आॅफ आॅस्ट्रेलियाने धोरणात्मक व्याजदर कपात करून ०.५ टक्क्यांवर आणला आहे. रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटले आहे की, जागतिक आणि देशांतर्गत परिस्थितीवर रिझर्व्ह बँकेकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. वित्तीय बाजारांचे कामकाज नियमित सुरू राहावे, बाजारात आत्मविश्वास टिकून राहावा आणि वित्तीय स्थैर्य टिकून राहावे, यासाठी रिझर्व्ह बँक योग्य कृती करण्यास सज्ज आहे.‘डीबीएस’ या संस्थेचे व्यवसायप्रमुख आशिष वैद्य यांनी सांगितले की, परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जोखमीचा रुपयावर परिणाम होईल. कारण भारतात अजूनही काही स्थूल दुर्बलता आहेत.‘एबीक्सकॅश वर्ल्ड मनी’चे व्यवसायप्रमुख हरिप्रसाद एम. पी. यांनी सांगितले की, विदेशी चलनाच्या किरकोळ मागणीत घसरण झाल्याचे आम्हाला दिसून आले नाही. तथापि, थायलंड, हाँगकाँग, मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्या चलनाची खरेदी लक्षणीयरीत्या घटली आहे. या देशांत पर्यटनाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटल्याचा हा परिणाम आहे.>... तर रुपया घसरेल‘आयएफए ग्लोबल’चे संस्थापक अभिषेक गोयंका यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचे आणखी रुग्ण भारतात आढळल्यास रुपया घसरून ७४.५0 वर जाऊ शकतो.
कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 5:02 AM